
रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार, NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई : नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात NCPA मधील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या पुढाकाराने कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतनवाढ करार करण्यात आला आहे. या करारानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा तब्बल ₹7,250 ची वाढ, तर दरवर्षी ₹50,000 बोनस देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा करार करण्यात आला. विशेष म्हणजे हा करार 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 अशा चार वर्षांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे.
NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान झालेला हा तिसरा वेतनवाढ करार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. गेल्या काही काळापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी संघटनेकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश आलं असून कर्मचाऱ्यांना थेट पगारवाढ आणि बोनसचा फायदा मिळणार आहे.
BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…
यापूर्वी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियन ही प्रमुख कामगार संघटना होती. मात्र, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक पातळीवर जोरदार काम करत मुंबई लेबर युनियनच्या सदस्यांना आपल्या संघटनेत आणले. त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील प्रक्रियेतून संघटनेला NCPA मधील प्रमाणित आणि प्रमुख कामगार संघटना म्हणून स्थान मिळाल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर झालेला वेतनकरार कामगार संघटनेसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. पगारवाढीसोबतच वार्षिक बोनसची तरतूद झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होणार आहे.
भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) यांच्यात ४ वर्षांचा ऐतिहासिक वेतन करार करण्यात आला. कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांच्या न्याय हक्कांना आणि आर्थिक सुरक्षिततेला बळ देणारा हा ऐतिहासिक करार निश्चितच… pic.twitter.com/RfGlDmiYGy — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) September 3, 2026
कराराच्या स्वाक्षरी समारंभाला NCPAच्या वतीने अध्यक्ष संटूक, संचालक फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक काळे आणि मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक व्हिन्सेंट डिसूझा उपस्थित होते. तर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाकडून सरचिटणीस सुहास माटे, उपाध्यक्ष प्रशांत वर्तक यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
“कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश म्हणजे एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली NCPA मधील कामगारांना मिळालेली ही वेतनवाढ भविष्यातील अधिक चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.” असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.