‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश (फोटो सौजन्य-X)
मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे शहरांचा विस्तार होत आहे. नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासह नागरिकांना ‘ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देणे सध्या गरजेचे आहे. परिवहन सेवेचे पुढचे पाऊल ‘पॉड टॅक्सी’ असून ही सेवा’ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ साठी नागरिकांच्या सेवेत आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठकीत दिले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ‘बिझनेस डिस्ट्रिक्ट’ मध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी भविष्यात होणारे बुलेट ट्रेन स्टेशन, मुंबई उच्च न्यायालय यामुळे या भागातील नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या परिवहन सेवेवर यामुळे ताण येऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात या भागात नागरिकांना विनाविलंब आणि सहजरित्या परिवहन सेवा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी पर्याय ठरेल.
मुंबईमध्ये सर्व परिवहन सेवांमध्ये सिंगल कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. याच सिंगल कार्डद्वारे पॉड टॅक्सीची सेवाही नागरिकांना घेता आली पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. पॉड टॅक्सीच्या अनुषंगाने कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यात यावा. कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलीस निवासाच्या जागेऐवजी पोलिसांना त्याच भागात जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. या भागाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता जागतिक दर्जाची सेवा राहील याची काळजी घेण्यात यावी. स्टेशनबाहेर असलेले स्कायवॉक आणखी उपयोगात आणण्यासाठी चांगल्या संकल्पनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
जेवार विमानतळ सेक्टर २१ फिल्म सिटीशी पॉड टॅक्सीद्वारे जोडले जाईल, ज्या दररोज अंदाजे ३७,००० प्रवाशांची वाहतूक करतील अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, हा कॉरिडॉर १४.६ किमी लांब असेल आणि त्यात १२ थांबे असतील. हा जगातील सर्वात मोठा पॉड कॉरिडॉर असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ₹८१० कोटी खर्च येईल असा अंदाज आहे. पॉड टॅक्सींसाठी एक उन्नत कॉरिडॉर बांधला जाईल.
एकूण १२ स्थानके असतील. ही स्थानके नोएडा विमानतळ, साठ मीटर रोड, ७५ मीटर रोड, सेक्टर ३२, सेक्टर ३३, सेक्टर २९, सेक्टर २८ मध्ये दोन आणि सेक्टर २१ मध्ये तीन असतील.
सध्या, दक्षिण कोरिया, दुबई, सिंगापूर, अमेरिका आणि लंडनसह अनेक देशांमध्ये पॉड टॅक्सी कार्यरत आहेत.
विमानतळ ते फिल्म सिटी पर्यंत १४.६ किमी एलिव्हेटेड ट्रॅक
₹६४१ कोटींच्या प्रकल्पांतर्गत, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते फिल्म सिटी पर्यंत १४.६ किमी लांबीचा एलिव्हेटेड ट्रॅक बांधला जाईल. हा जगातील सर्वात लांब पॉड टॅक्सी ट्रॅक असेल. या ट्रॅकवर एक्सप्रेस आणि नियमित पॉड दोन्ही चालवली जातील.