Dahisar-Bhayander Coastal Road: केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्यामुळे, दहिसर ते भाईंदर हा महत्त्वाचा महामार्ग तयार करण्याचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. हा मार्ग पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, दहिसर-भाईंदर ६० मीटर रस्त्यासाठी आवश्यक असलेली ५३.१७ एकर जमीन केंद्रीय मिठागार मंत्रालयाने राज्य शासनाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दहिसर ते भाईंदर आणि पुढे वसई-विरारपर्यंत जाणारा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या सुरू असलेला कोस्टल रोड उत्तनपर्यंत येणार आहे. तेथून दहिसर-भाईंदर हा ६० मीटर रुंदीचा रस्ता मीरा रोड येथील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जोडला जाईल आणि पुढे वसई-विरार शहरांनाही जोडला जाणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. एल अँड टी (L&T) ही कंपनी हे काम करणार असून, पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी येणारा सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिका करणार आहे.
राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट होणार बंद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच घेणार निर्णय
यापूर्वी कोस्टल रोड उत्तन येथून विरारकडे समुद्रकिनाऱ्यावरून जाणार होता. मात्र, तेथील कोळी बांधवांनी याला विरोध केला होता. ही मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यांच्या मागणीला मान्यता मिळाल्यामुळे, हा मार्ग आता उत्तन ते दहिसर आणि तेथून मीरा-भाईंदरमार्गे वसई-विरारकडे जमिनीवरून जाणार आहे. यामुळे कोळी बांधवांच्या रास्त मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. भविष्यात या महामार्गामुळे मीरा-भाईंदर मुंबईशी अधिक जोडले जाईल आणि लवकरच मुंबई शहराचे उपनगर म्हणून आपली ओळख निर्माण करेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.