विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर (फोटो- सोशल मीडिया)
राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण
भारत हा जगातील सर्वात तरुण देश
२०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे ध्येय
मुंबई: व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच (Maharashtra Government) प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन २०२० ते २०२५ या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, समाजात परिवर्तन घडविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग प्रभावीपणे करत असून, लोकोपयोगी उपक्रमांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे. या सोहळ्यात १०० हून अधिक व्यक्ती आणि १३ संस्थांचा गौरव होत असून, हे कार्य राष्ट्रनिर्मितीला बळ देणारे आहे, असे त्यांनी नमूद केले. व्यसन ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान, उत्पादकतेत घट, आरोग्य व्यवस्थेवर ताण, गुन्हेगारीत वाढ, कुटुंबव्यवस्थेचे विघटन आणि शिक्षणातील गळती वाढते, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट
भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे ध्येय आहे. या पार्श्वभूमीवर युवाशक्तीचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध शांत न राहता सक्रिय भूमिका घेण्याची गरज आहे. समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पुढील काळात अधिक व्यापक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष अॅड नार्वेकर यावेळी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. “व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे,” असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.






