'दुबे तू फक्त मुंबईत ये, नाही तुला अरबी समुद्रात..; मराठीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या निशिकांत दुबेंना राज ठाकरेंचं आव्हान
‘मराठी लोक कुणाची भाकरी खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. शिवाय हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर, महाराष्ट्राबाहेर या आपटून आपटून मारू, असं वादग्रस्त विधान खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होतं. त्याचा आज राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. दुबे तुम्ही एकदा मुंबईत या तुम्हाला नाही मुंबईच्या समुद्रात बुडवून मारलं तर नाव सांगणार नाही, असं खुलं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं आहे.
मिरारोडमध्ये आज (शुक्रवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. अलीकडील मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी मोर्च्यानंतर मिरारोडमध्ये राज ठाकरे यांची ही पहिलीच सभा असल्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात परप्रांतीयांच्या मोर्चावर जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात राहत असाल, तर शांततेत राहा. मस्ती केल्यास दणका बसणारच,” असा इशारा त्यांनी दिला. “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. सरकारला जर आत्महत्या करायची असेल, तर त्यांनी खुशाल करावी. आता दुकाने बंद केली, नंतर शाळाही बंद करेन,” असे वक्तव्य त्यांनी केले.
“अनेक वर्षांपासून मुंबईवर त्यांचा डोळा आहे. ते तुम्हाला चाचपडून पाहत आहेत. हिंदी सक्तीने लादून मराठी माणूस पेटतो का, हे ते तपासत आहेत. मराठी माणूस जर शांत दिसला, तर हिंदी आणणे ही पहिली पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि ती गुजरातला न्यावी, हे त्यांचे स्वप्न आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेला उत्तर देताना, सभेतून त्यांना खुले आव्हान दिले. “दुबे, तू आम्हाला पटक पटक के मारशील? दुबे, तू मुंबईत ये… मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे,” अशा शब्दांत त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर हल्लाबोल केला.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मराठी माणसासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. “दुबे, तू मुंबईत येऊन दाखव,” असे ठणकावून सांगत त्यांनी रोष व्यक्त केला.
“भाषेचा मुद्दा कुठे येतो? तुमची भाषा संपली आणि पायाखालची जमीन गेली की मग काही अर्थ राहत नाही. भाषा आणि जमीन टिकवणं आवश्यक आहे. मुंबईत काही घडलं की देशभर गोंधळ घालतात. हिंदी चॅनेलवाले सत्ताधाऱ्यांच्या चपलाखालचे ढेकूण आहेत,” अशी तीव्र टीका त्यांनी माध्यमांवर केली.
राज ठाकरे यांनी २८ सप्टेंबर २०१८ च्या गुजरातमधील घटनेचा दाखला देत, माध्यमांच्या भूमिका आणि निवडक वार्तांकनावर सवाल उपस्थित केला. “बिहारी लोकांना तेव्हा गुजराती लोकांनी मारहाण केली. २० हजार जणांना हाकलून दिलं. पण ही बातमी कुठे दिसली? त्यांच्या राज्यात हे सगळं चालतं. गुजरातमध्ये बाहेरच्या लोकांना हाकललं जातं, तरीही कोणी बोलत नाही. पण इथे एखाद्या मिठाईवाल्याच्या कानाखाली मारलं, तर ती देशभरातली मोठी बातमी होते. हे कसलं राजकारण आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.