
शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारांची घोषणा,प्रचाराचा केंद्रबिंदू विकासाचा मुद्दा राहणार
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुती आघाडीत कोंडी झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपच्या ५० जागांच्या ऑफरला नकार देत आहे. शिंदे सेना ८० ते ९० जागांची मागणी करत आहे. भाजप २२७ बीएमसी जागांपैकी १५० जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देत आहे, ज्यामध्ये ५० जागा शिंदे सेनेला आणि २७ जागा, बहुतेक अल्पसंख्याकबहुल भागात, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (एनसीपी) देण्याचा प्रस्ताव आहे.
याचदरम्यान, महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज (24 डिसेंबर) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज (24 डिसेंबर) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यादी जाहीर करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेते यांचा समावेश आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर प्रचाराचा झंझावात केला होता. नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६२ हून अधिक नगराध्यक्ष विजयी झाले तर ८५० हून अधिक नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. आता २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेकड़ून विकासाचा अजेंडा मतदारांपुढे सादर केला जाणार आहे.
सध्या, महायुतीच्या घटक पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे बीएमसी निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. जागावाटपाचा हा वाद येत्या काळात युतीच्या एकतेसाठी आणि निवडणूक रणनीतीसाठी मोठी परीक्षा ठरू शकतो. बीएमसी निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत आणि नामांकन प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. अलिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या प्रचंड विजयामुळे भाजपची स्थिती मजबूत झाली आहे, जिथे तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.