"नगर परिषदांप्रमाणेच महापालिकांमध्येही महायुतीची त्सुनामी धडकणार," संजय निरुपम यांचा विश्वास
निरुपम म्हणाले की, या निवडणुकीत ६३ टक्के स्ट्राईक रेटसह भाजप पहिल्या क्रमांकावर असून शिवसेना ५५ टक्के स्ट्राईक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४ टक्के स्ट्राईक रेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिन्ही पक्ष स्वतंत्र लढले तरीही त्यांच्या विजयाचा कौल नगर परिषदांमधील मतदारांनी दिल्याचे निरुपम म्हणाले. महाराष्ट्रातील मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीच्या कारभारावर शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. या यशात लाडकी बहिण, शेतकरी, युवा, ज्येष्ठ यांचे योगदान आहे. अशाच प्रकारचे यश महापालिका निवडणुकांमध्ये मिळेल आणि जास्तीत जास्त महापालिकांवर महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.
निरुपम पुढे म्हणाले की, या निकालातून उबाठाची कामगिरी आणखी खालावली असून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून उबाठा हद्दपार झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात उबाठाचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही. या निकालांमधून उबाठाच्या नेतृत्वाला मतदारांनी स्पष्ट नाकारले. नगर परिषद निकालांमध्ये उबाठा पाचव्या क्रमांकावर असून त्यांचा स्ट्राईक रेट केवळ १८.५ टक्के इतका राहिला. शिवसेनेचे ५३ नगराध्यक्ष निवडून आले तर उबाठाचे फक्त ९ नगराध्यक्ष विजयी झाले. उबाठाची अवस्था आता एकेरी आकड्यांपर्यंत खाली आल्याची टीका निरुपम यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे खरे वारसदार शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांनी दाखवून दिले. चार वर्षांपूर्वी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर विकास आणि लोककल्याण या दोन मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी राज्यभर काम केले आणि मराठी माणसांचे मन जिंकले, असे निरुपम म्हणाले. विधानसभेतील यशाबाबत शिवसेनेवर विरोधकांनी टिका केली होती हे यश भाजपमुळे मिळाले, असे विरोधक म्हणत होते. मात्र नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये शिवसेनेने बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढून विजयश्री खेचून आणली, असे निरुपम म्हणाले. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चांदा ते बांदापर्यंत पोहोचला आहे, असे निरुपम म्हणाले.






