
Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात अभ्यास केंद्र, आमदार व खासदारांकडे फेलोशीप प्रोग्रॅम शिवसेनेकडून लवकरच सुरु केले जातील, अशी ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. अंधेरी येथे आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आनंद परांजपे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे यांनी येथे जमलेल्या जेन झींशी थेट संवाद साधला. त्यांचे प्रश्न समजून घेतले. ते म्हणाले की, नीट पेपर फुटीनंतर संसदेत कठोर कायदा मंजूर करण्यात आला. यात दोषींना १० वर्षांची जेल आणि १० कोटींचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा आणि तंत्रज्ञानाच्या वापरासह सक्षम यंत्रणा विकसित केली जाईल.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंबरनाथमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले आहे, यातून अनेक विद्यार्थींनी यश मिळवले. तशाच प्रकारे प्रत्येक विधानसभेत स्पर्धा परीक्षा केंद्र आणि २४ तास लायब्ररी सुरु केली जाईल. खासदार आणि आमदारांकडे फेलोशीप सुरु करण्याबाबत पक्ष विचार करतोय. यात मुलांना राजकारणाचा आणि धोरण बनवण्याचा अनुभव दिला जाईल, असे ते म्हणाले.
तसेच आज जेन झीच्या माध्यमातून जगभरात जे प्रश्न उपस्थित केले जातात त्यांना सरकार ऐकत आहे, त्यावर प्रतिसाद देत आहे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र कसा हवाय, हे जेन झींकडून समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप हब आहे. ५०० बिलियन डॉलर्सच्या या क्षेत्रात १२० हून अधिक युनिकॉर्न्स आहेत. राज्याने एआयसाठी नवे धोरण तयार केले आहे. स्टार्टअप्ससाठी एक सर्वांगिण इकोसिस्टम बनवण्याचे काम राज्य सरकार करत आहेत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
लाडकी बहिण योजनेप्रमाणे सरकारने राज्यात लाडका भाऊ योजना देखील राबवली. आताही जेन झींबाबत अशी काही योजना सुरु करता येईल का, याचा नक्की विचार करु, अशी ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. रेल्वेत विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी व्यवस्था करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करु असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
काही लोक जेन झीला मतदार म्हणून टार्गेट करत आहेत. जेन झींच्या नावावर अराजकता पसरवण्याचे काम केले पण जेन झी हुशार पिढी आहे, कोण त्यांचा वापर करतंय आणि कोण त्यांना मतदानासाठी वापरणार हे त्यांना माहित आहे. आज जे देशभर फिरत आहेत ते त्यांचा राजकीय संदेश देण्यासाठी फिरत आहेत, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी राहुल गांधींवर केली.
२०१४ पूर्वी भारतात रोजगार आणि बेरोजगारी किती होती, पायाभूत सेवा किती विकसित झाली होती याचा आढावा आपण घेतला पाहिजे. २०१४ चा काळ कसा होता आणि २०१४ नंतर कसा आहे याचा अभ्यास केला तर तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल, असे ते जेन झींना म्हणाले. भारताचा नेट एम्प्लॉयमेंट आउटलूक इंडेक्स ६८ टक्के आहे तर यूएसचे ३८ टक्के आणि चीनचा फक्त २९ टक्के आहे. रोजगार वाढवण्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे, असे ते म्हणाले.
KDMC News: वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा