Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या Gen Z आणि युवा मतदारांकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या ‘क्रॉकोच जनता पार्टी’च्या आंदोलनांनंतर तरुणांच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेले आहे. आता सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गटानेही Gen Zसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता युवकांसोबत युवा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात तरुणांच्या समस्या, अडचणी आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात Gen Zसोबत संवाद साधला होता. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही तरुणांशी संवाद साधला. त्यामुळे Gen Zच्या प्रश्नांवर राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा वाढताना दिसत आहे.
‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तरुणांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. युवकांच्या बदलत्या अपेक्षा आणि त्यांच्यासमोरील आव्हाने समजून घेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
‘क्रॉकोच जनता पार्टी’च्या आंदोलनांमुळे तरुण पिढीच्या प्रश्नांकडे देशाचे लक्ष वेधले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. नीट परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या आंदोलनानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ‘छात्रों की गुंज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. कोटा, प्रयागराज आणि पुणे येथे झालेल्या कार्यक्रमांना तरुणांचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
त्यामुळे आगामी काळात Gen Zचा आवाज, त्यांचे प्रश्न आणि त्यांची राजकीय भूमिका हा महत्त्वाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांकडून तरुणांशी थेट संवाद साधण्याचे वाढते प्रयत्न हे त्याचेच संकेत मानले जात आहेत.






