
महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ
मुंबई : गणेशोत्सव सुरू असतानाच महागाईने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. घाऊक आणि किरकोळ महागाईची नवीन आकडेवारी पाहता सर्वसामान्यांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही चिंतेत सापडले आहे. आगामी काळात लोकांच्या खिशाला मोठा फटका बसणार असून, प्रत्येक वस्तूसाठी अधिक मोजावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून ४.८२ टक्क्यांवर पोहोचला. तर, घाऊक महागाई दर ऑगस्ट २०२६ मध्ये वार्षिक आधारावर वाढून ९.९२ टक्क्यांवर पोहोचला, जो जुलै महिन्यात ९.७८ टक्के होता. जुलै महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाई ४.४५ टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ऑगस्ट महिन्यात सर्व वस्तूंचा डब्ल्यूपीआई ११०.८ नोंदवला गेला, जो जुलैमध्ये ११०.० होता. ही सर्व आकडेवारी २०२२-२३ हे आधारभूत वर्ष मानून तयार केलेल्या नवीन डब्ल्यूपीआय मालिकेवर आधारित आहे.
तीन मुख्य गटांपैकी प्राथमिक वस्तूंच्या महागाईचा दर जुलै महिन्यातील प्रसिद्ध केलेल्या सीपीआय आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात अन्नधान्य व खाद्यपदार्थांची महागाई ५.९५ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी जुलै महिन्यात ५.५२ टक्के होती. रिझर्व्ह बँकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ५ टक्के वर्तवला आहे. यामध्ये दुसऱ्या तिमाहीत ४.७ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ५.९ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.५ टक्के महागाई राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, इंधन आणि विजेचा महागाई दर २०.०५ टक्क्यांवरून थेट २२.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादित वस्तूंच्या महागाईच्या दरात ८.२९ टक्क्यांवरून किरकोळ वाढ होऊन तो ८.३७ टक्के झाला आहे.
महागाईत होतेय वाढ
स्वयंपाकघरापासून ते तुमच्या खिशापर्यंत, महागाईचा दबाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीने सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर (सीपीआय) वाढून ४.४५% वर पोहोचला आहे, जो याआधीच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये ४.३८% होता. हा आकडा अर्थतज्ज्ञांच्या ४.५०% च्या अंदाजापेक्षा थोडा कमी असला, तरी तो अजूनही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ४% च्या निश्चित लक्ष्यापेक्षा सलग वरच आहे.