
तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका! मुंबईतील 'या' ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित (Phtoo Credit- X)
🚨 ब्रेकिंग | मुंबईतील ३ हॉटेलांचे परवाने निलंबित; अमरावतीतील आस्थापनाला व्यवसाय बंदची नोटीस
अन्न व औषध प्रशासन (एफडीए )ने १३ जुलै २०२६ रोजी केलेल्या तपासणीत गंभीर अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर मुंबईतील ३ हॉटेलांवर कठोर कारवाई करण्यात आली.
📍 भेंडीबाजार 🔹 शालिमार… pic.twitter.com/HA26ix7Gx5 — नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri) July 14, 2026
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील या अत्यंत लोकप्रिय हॉटेल्सची तपासणी केली असता, तिथे स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आले. भेंडीबाजार येथील प्रसिद्ध ‘शालिमार हॉस्पिटॅलिटी’ला एफडीएकडून यापूर्वीच सुधारणा नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हॉटेल व्यवस्थापनाने सुधारणा केली नाही आणि तपासणीत तब्बल २५ गंभीर त्रुटी जशाच्या तशा आढळल्याने १४ जुलै २०२६ रोजी त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला.
‘नूर मोहम्मदी’ हॉटेलच्या किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता, खाद्यतेलाचे काळे थर आणि माश्या-कीटकांचा मुक्त वावर आढळला. तर उमरखाडी येथील ‘रहमानिया रेस्टॉरंट’मध्ये गंजलेली उपकरणे आणि निकृष्ट साठवणूक आढळून आली. या दोन्ही हॉटेल्समध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही चाचणी केली नव्हती. त्यामुळे यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.
मुंबईव्यतिरिक्त एफडीएने विदर्भातही आपला मोर्चा वळवला आहे. अमरावती येथील प्रसिद्ध ‘अमरावती दरबार’ या हॉटेलची तपासणी केली असता, हे आस्थापन कोणत्याही वैध अन्न परवान्याविना बेकायदेशीरपणे व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने या हॉटेलला त्यांचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील जनतेला सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी एफडीए आगामी काळातही अशा प्रकारच्या आकस्मिक मोहिमा आणि कडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.