
मतदानापूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी! उद्धव आणि राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतले दर्शन; विजयासाठी साकडं (Photo Credit- X)
मुंबईची रक्षक मानल्या जाणाऱ्या मुंबादेवी मंदिरात आज सकाळपासूनच मोठी लगबग पाहायला मिळाली. गुरुवारी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार असून, त्यापूर्वी मुंबईच्या सत्तेचे महत्त्व ओळखून दोन्ही नेत्यांनी दर्शनासाठी वेळ काढली. सकाळी ११ च्या सुमारास उद्धव ठाकरे आपल्या पत्नी रश्मि ठाकरे आणि दोन्ही मुलांसह मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे खासदार संजय राऊत आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. ठाकरे कुटुंबाने देवीची विधीवत पूजा केली आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. उद्धव ठाकरे मंदिर परिसरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने राज ठाकरे आपल्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि कुटुंबासह मंदिरात दाखल झाले. त्यांनीही आई मुंबादेवीची ओटी भरून विजयासाठी प्रार्थना केली.
आज पक्षप्रमुख मा. श्री.उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी सहकुटुंब आई मुंबा देवीचे दर्शन घेतले. तसेच मुंबईच्या, मुंबईकरांच्या भल्यासाठी प्रार्थना केली. pic.twitter.com/TgOXTIpzcQ — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 14, 2026
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेवर वर्षानुवर्षे असलेल्या वर्चस्वाचा गड राखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांची मनसे या निवडणुकीत मोठी भरारी घेऊन ‘किंगमेकर’च्या भूमिकेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मतदानापूर्वी देवीचे दर्शन घेऊन हिंदू मतांना आणि मराठी अस्मितेला साद घालण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अकोल्यासह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ म्हणून संबोधले जात आहे. शुक्रवारी (१६ जानेवारी) होणाऱ्या मतमोजणीनंतर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
मुंबादेवी मंदिर परिसरात व्हीआयपी भेटींमुळे आज कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने उद्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला जाणार आहे.