काय आहे हे 'PADU' मशीन? मुंबई महापालिका निवडणुकीत EVM मध्ये होणार मोठा बदल (Photo Credit- X)
राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तर देताना पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी सांगितले की, PADU मशीन हे ईव्हीएमसाठी एक ‘बॅकअप डिस्प्ले’ म्हणून काम करेल. डिप्लॉय प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट (PADU). हे मशीन बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटला जोडले जाईल. जर मतदानादरम्यान किंवा मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले अचानक बंद पडला किंवा तांत्रिक बिघाडामुळे अस्पष्ट झाला, तर ‘PADU’ मशीनवर ती आकडेवारी स्पष्टपणे पाहता येईल. हे एक साहाय्यक उपकरण (Auxiliary Device) आहे. ‘भेल’ (BHEL) या सरकारी कंपनीने त्याची निर्मिती केली आहे.
गगरानी यांनी स्पष्ट केले की, PADU आणि VVPAT मध्ये गोंधळ करू नये. VVPAT मधून मतदानाची छापील पावती मिळते, मात्र PADU मशीनमधून कोणतीही कागदी पावती (Slip) निघणार नाही. हे केवळ मोठी स्क्रीन असलेले डिस्प्ले युनिट आहे, जेणेकरून मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि दृश्यमान होईल.
निवडणूक आयोगाचा आणखी एक डाव! EVM मशीनला जोडलं नवीन मशीन, विरोधकांचा चढला पारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘PADU’ मशीनच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, “या नवीन मशीनबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाला आगाऊ माहिती देण्यात आली नाही. ही मशीन नेमकी दिसते कशी आणि ती काय काम करते, हे कोणालाच माहीत नाही. ईव्हीएम जुन्या झाल्याचे कारण देऊन नवीन काहीतरी घुसवण्याचा हा प्रयत्न आहे का? लोकसभा किंवा विधानसभेला नसलेले नियम महापालिकेतच का आणले जात आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, मतदानाच्या दिवसापर्यंत ‘डोअर टू डोअर’ प्रचाराच्या परवानगीवरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली.
निवडणूक आयोगाचा नवीन घोळ, मनाला वाटेल ते चालू आहे. 🤦🏽♂️#PADU #ElectionCommission pic.twitter.com/0cw7qrVDfi — Adarsh Kasar (@KasarAdarsh) January 14, 2026
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोगाकडून सध्या १४० PADU युनिट्स पाठवण्यात आली आहेत. ही मशिन्स प्रत्येक मतदान केंद्रावर असतीलच असे नाही, तर आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास ती वापरली जातील. सध्या ही यंत्रणा केवळ बॅकअप पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उद्याच्या मतदानावर आणि या नवीन तांत्रिक बदलांमुळे प्रत्यक्ष प्रक्रियेत काय फरक पडतो, याकडे लागले आहे.






