
दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेशोत्सवात दरवर्षी विविध आकर्षक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे पाहायला मिळतात. यंदा विक्रोळी पश्चिम येथील प्रसिद्ध बाल मित्र कला मंडळ अर्थात ‘विक्रोळीचा मोरया’ एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेमुळे चर्चेत आले आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच दुर्वांपासून घडवलेली वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती मंडपात विराजमान करण्यात आली आहे.
गणपती बाप्पाच्या पूजेत दुर्वांना विशेष महत्त्व आहे. याच दुर्वांचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारण्याची संकल्पना मंडळाने यंदा मांडली आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी ही मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहे.
बाल मित्र कला मंडळाची स्थापना १९७२ मध्ये झाली. धार्मिक उत्सवांसोबत विविध सामाजिक उपक्रमांमध्येही मंडळाचा सहभाग राहिला आहे. अनेक दशकांची परंपरा असलेल्या मंडळाने यंदा दुर्वांच्या गणेशमूर्तीच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
केवळ गणेशमूर्तीच नाही, तर मंडळाची यंदाची थीमदेखील लक्षवेधी आहे. ‘गुरू ते गुगल गुरू’ अशी यंदाच्या उत्सवाची संकल्पना आहे. पूर्वी ज्ञान मिळवण्याचे प्रमुख माध्यम गुरू होते. गुरु-शिष्य परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानाचा वारसा पोहोचत गेला. कालांतराने शिक्षणपद्धती बदलली आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढला. आज इंटरनेट आणि सर्च इंजिनच्या माध्यमातून काही क्षणांत माहिती उपलब्ध होते. याच बदलत्या ज्ञानप्रवासावर ‘गुरू ते गुगल गुरू’ ही संकल्पना आधारित आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तीचे मूर्तिकार रतन बागवे आहेत. भांडुप येथील बागवे यांच्या हातून दुर्वांच्या माध्यमातून बाप्पाचे रूप साकारण्यात आले. यंदाच्या देखाव्याचे कला दिग्दर्शन स्वप्नील सामंत यांनी केले असून संकल्पनेचे लेखन आणि निवेदन विजय कदम यांचे आहे. मूर्ती, कला दिग्दर्शन आणि कथन यांच्या माध्यमातून भाविकांना एक वेगळा अनुभव देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
गणेशपूजेत दुर्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. गणेशोत्सवात भाविक आवर्जून बाप्पाला दुर्वा अर्पण करतात. त्यामुळे बाप्पाशी धार्मिकदृष्ट्या जोडलेल्या दुर्वांपासूनच गणेशमूर्ती साकारण्याची कल्पना भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
‘विक्रोळीचा मोरया’चा मंडप ब्लूमेन बिल्डिंग शेजारी, स्टेशन रोड, विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०००८३ येथे आहे. त्यामुळे मुंबईतील भाविकांना यंदा विक्रोळीत ही आगळीवेगळी गणेशमूर्ती पाहण्याची संधी मिळणार आहे.
एका बाजूला गणपतीला प्रिय मानल्या जाणाऱ्या दुर्वांपासून साकारलेली मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला ‘गुरू ते गुगल गुरू’ अशी आधुनिक काळाशी जोडणारी थीम, या दोन्ही गोष्टींमुळे यंदाचा ‘विक्रोळीचा मोरया’ विशेष ठरत आहे. रंपरिक श्रद्धा, पर्यावरणपूरकतेचा विचार आणि बदलत्या डिजिटल युगातील ज्ञानप्रवास या तिन्ही गोष्टी एकाच गणेशोत्सवात मांडण्याचा प्रयत्न बाल मित्र कला मंडळाकडून करण्यात आला आहे.
Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व