कन्हान : कौटुंबिक कलहातून (Domestic Voilence) पतीने चाकूने गळा चिरून पत्नीची हत्या केली. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कन्हानजवळच्या टेकाडी गावात ही घटना घडली. घटनेनंतर पतीने स्वतःहून कन्हान पोलिस ठाण्यात पोहोचून आत्मसमर्पण केले. दुलेश्वरी ऊर्फ कुसूम भोयर (वय 25) असे मृत पत्नीचे तर अमित भोयर (वय 30) असे अटकेतील पतीने नाव आहे.
मंगळवारी सकाळी दुलेश्वरीचा सासूसोबत वाद झाला. सासू नेहमी होणाऱ्या भांडणाची तक्रार पोलिसात करायला जात असल्याचे सांगून घरून निघून गेली. वडील आणि बहिण सकाळीच कामावर निघून गेले होते. अमितचा पत्नीसोबत वाद भडकला. त्याने घरातील चायनीज चाकूने पत्नीच्या पाठीवर वार केला. नंतर तिचा गळा चिरला. तिच्या मृत्यूची खातरजमा केल्यानंतर अमित भोयर थेट कन्हान पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांना घटनेची माहिती देत आत्मसमर्पण केले.
प्रेमविवाहाचा करुण अंत
दुलेश्वरचीचे माहेर कामठीजवळच्या रणाळा येथील असून, आर्थिक स्थिती भक्कम आहे. तिचे 12 वीपर्यंतचे शिक्षण झाले होते. अमित जरीपटक्यातील कापड दुकानात कामाला होता. दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटला. दुलेश्वरीच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध असल्याने ती अमितसोबत पळून गेली. नागपुरातील एका मंदिरात दोघांनी विवाह केला. त्यानंतर अमित दुलेश्वरी आपल्या घरी घेऊन आला.
लग्नाला आधी विरोध नंतर कुटुंबियांकडून मान्यता
प्रथम त्याच्या कुटुंबीयांनीही विरोध केला. अमितने सर्वांची समजूत काढल्याने अखेर लग्नाला मान्यता दिली. त्यानंतर 5 मार्चला रितिरिवाजानुसार थाटात लग्न सोहळा पार पडला. प्रारंभीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले आणि आज त्याचा करून अंत झाला. दोघांना महिन्यांची मुलगी आहे.