मुंबई : देशात सध्या समान नागरी कायद्याची (Uniform Civil Code) चर्चा सुरु आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असलेल्या ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी झाल्याचं दिसतंय. समान नागरी कायदा आणा, आपला त्याला पाठिंबा असेल, असं विधान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात केलंय. समान नागरी कायद्याला पाठिंबा असेल. मात्र, या कायद्याचा हिंदूंना काय त्रास होणार आहे, हेही सांगा, अशी अट त्यांनी केंद्र सरकारपुढं घातली आहे. या शिबिराच्या निमित्तानं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लक्ष्य केलं आहे.
उद्या जागतिक गद्दार दिन
19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जागतिक गद्दार दिन आहे, अशी टाकी ठाकरे यांनी केलीय. आमदार-खासदार फोडून सत्ता स्थापन केलीत. लाचार मिंधे सत्ता आणि खोक्यांसाठी तिकडं गेलं, मात्र कट्टर शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, असा दावा ठाकरेंनी केलाय.
शहा, अफजल खानाची फौज
2014 च्या प्रचारात अफजलखानाची फौज येणार असं आपण सांगत होतो, ते आता अनेकांना पटलं असेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, कितीही शहा आणि अफजलखान आले तरी आपल्याला टेन्शन नाही, कारण शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही कुणावर हात उचलू नका, पण तुमच्यावर कुणी हात उचलला तर हात तोडून वेगळा करा, असा संदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिलाय.
पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
रशिया-युक्रेनचं युद्ध पंतप्रधान मोदींनी थांबवलं असं सांगितलं जातं, ही कथा सत्य करायची असेल तर त्यांनी मणिपूरला जाऊन ते शांत करुन दाखवावं, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलंय. अदानीवर प्रश्न विचारला की तुमची बोबडी वळते, राहुल गांधींना तुम्ही घराबाहेर काढता, अशी टीका ठाकरे यांनी केलीय.
देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र येत आहोत, ही एकजूट विरोधकांनी नव्हे तर देशप्रेमींची आहे, असं सांगत 23 जून रोजी पाटण्यात होणाऱ्या सर्वपक्षीयांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.