नागपूर. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) प्रस्तुत ‘नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी सामाजिक उत्कर्ष संमेलना’चे आयोजन येत्या 5 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहे. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमानिमित्त संविधान रॅलीसह बार्टी, सारथी, लिडकॉम व महाज्योतीच्या योजनांची माहिती व लाभार्थांच्या यशोगाथावर प्रकाश टाकला जाणार आहे. महायुती सरकारने बार्टी, सारथी, लिडकॉम व महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पेरला आहे. या लाभार्थींचे अनुभव, अधिकाऱ्यांसोबत संवाद, योजनांची निकड व यश आदीवर चर्चा होणार आहे.
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने बार्टी, सारथी, महाज्योती, लिडकॉमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणे, एवढेच लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची व्याप्ती, लाभार्थींचे यश हे प्रत्येकांपर्यंत पोहोचावे व इतर विद्यार्थ्यांनाही लाभ घेता यावा, यासाठी चर्चा, परिसंवादासाठी ‘नवभारत सामाजिक उत्कर्ष संमेलना’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या विशाल सभागृहात 5 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अधिकारी, लाभार्थी, यशस्वी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात शासकीय संस्थांचे स्टॉल
या कार्यक्रमात बार्टी, सारथी, महाज्योती, लिडकॉमचे स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलवरून विद्यार्थ्यांना महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ‘नवभारत सामाजिक उत्कर्ष संमेलन’ पथदर्शी कार्यक्रम ठरणार आहे.
रॅलीचे आयोजन
यानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत विद्यार्थ्यांसह लाभार्थी, अधिकारीही उपस्थित राहणार आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट, कॅपचे वितरण केले जाणार आहे. यावेळी शहरातील आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
रस्ते विकासावरही चर्चा होणार आहे
यावेळी एमएसआरडीसीने केलेल्या कामांचीही चर्चा होणार आहे. राज्याच्या समृद्धीसाठी एमएसआरडीसीच्या योजनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राज्याला अग्रेसर बनवण्यात एमएसआरडीसीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक गावात द्रुतगती मार्ग आणि महामार्गांचे जाळे विणून राज्याला अग्रस्थानी आणले आहे. वरिष्ठ अधिकारी यावर विचारमंथन करतील आणि भविष्यातील प्रकल्पांची माहितीही देतील.