फोटो सौजन्य सोशल मीडिया
विभागीय आयुक्त कार्यालय परिसराला राजकीय कार्यक्रमासारखे स्वरूप आले होते. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी सोमवारी अर्ज भरण्याचे जाहीर केल्याने प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले.
अनिल सोले यांनी अर्ज दाखल केला असला तरी शेवटी पक्ष हितासाठी ते माघार घेतील, अशी अपेक्षा भाजप उमेदवार माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केली. सोले माझे राजकीय गुरू असून पक्ष नेतृत्वासह सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
काँग्रेस महाविकास आघाडीचे अभिजीत दंजारी यांच्या नामांकनाची रॅली राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते अनिल देशमुख यांच्या जीपीओ परिसरातील निवासस्थानातून काढण्यात आली. या रॅलीतून काँग्रेसने एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री रणजित कांबळे
आमदार संजय मेश्राम, माजी आमदार अशोक धवड, अतुल लोंढे, अतुल कोटेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक रॅलीत सहभागी झाले होते. वंजारी यांनी दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर जवाहर विद्यार्थीगृह येथे त्यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
सुधाकर कोहळे यांच्या नामांकनासाठी पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली. सिव्हिल लाईन्समधील स्वागत लॉनपासून रॅली काढण्यात येणार होती. मात्र, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने अर्ज भरण्याची सूचना केली. बावनकुळे यांच्यासह राज्यमंत्रीद्वय आशिष जयस्वाल, पंकज भोयर, प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, विष्णु चागदे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र आले होते.
भाजपचे बंडखोरद्वय अनिल सोले व अॅड. रमण सेनाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) बंडखोर नितेश कराळे १०-१५ मिनिटांच्या फरकारने अर्ज भरण्यासाठी आले. सोले यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सेनाड यांच्यासोबतही बऱ्यापैकी समर्थक होते. कराळे यांनी संविधान चौकातून रॅली काढली. पगडी घालून आले होते. महात्मा गांधीच्या वेशभूषेतील कार्यकर्ता आणि महिला कार्यकर्त्याही त्यांच्यासोबत होत्या.






