फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्यातच अनेक वाहनचालक शॉर्टकटच्या नादात राँग साईडने प्रवास करीत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांच्या अनियमित उपस्थितीमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी रस्त्याच्या काही भागात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांसाठी उपलब्ध जागा मर्यादित झाली आहे. लांबचा यू-टर्न घेण्याची कसरत टाळण्यासाठी अनेक वाहनचालक थेट विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत.
परिसरातील दुकाने, व्यावसायिक आस्थापने, शाळा आणि विविध संस्थांमध्ये जाणारे नागरिकही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता वाढली आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी दुभाजक हटवून सर्व्हिस रोड मुख्य महामार्गाला जोडला होता. मात्र, या व्यवस्थेचा योग्य वापर न करता काही वाहनचालक राँग साईडने प्रवास करीत आहेत.
Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
वर्धा रोडवर उड्डाणपुलासोबतच मेट्रोचे बांधकामही सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. नागपूर ते बुटीबोरी हा प्रवास पूर्वी साधारण २० मिनिटांत पूर्ण होत होता. मात्र, आता याच अंतरासाठी जवळपास ४५ मिनिटे लागत असल्याची तक्रार नियमित प्रवासी करीत आहेत.
चिंचभुवन ते मिहान इंटरचेंजदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. नागपूरला वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद, यवतमाळ आणि मुंबईशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथील वाहतूक कोंडीचा परिणाम हजारो प्रवाशांवर होत आहे.
Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर
चिंचभुवन-मिहान इंटरचेंज उड्डाणपुलाची लांबी सुमारे २.६ किलोमीटर असून, हा सहापदरी प्रकल्प आहे. त्यासाठी ६१९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बहुतांश खांबांचे बांधकाम पूर्ण झाले असून, मिहान इंटरचेंजच्या दिशेने गर्डरचे सेगमेंट बसवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. नोव्हेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मात्र, बांधकाम पूर्ण होण्यास अद्याप वेळ असल्याने तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन, नियमित पोलीस बंदोबस्त आणि राँग साईड वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.






