
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपूर सुधार न्यास, महापालिका आणि शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आजही पारंपरिक उपायांवरच भर दिला जात आहे. तीन दशकांत शहराची लोकसंख्या दुपटीपेक्षा अधिक झाली असून, वाहनांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे.
मात्र, वाहतूक व्यवस्थेत त्याच प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान किंवा नावीन्य आलेले नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पातून चौकांवर सीसीटीव्ही बसवले. मात्र, या यंत्रणेचा वापर वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी अधिक होत असल्याची टीका केली जात आहे.
कागदावरील नियोजन आणि बैठका यापलीकडे जाऊन वाहतूक व्यवस्थेत प्रत्यक्ष बदल करण्याची वेळ आली आहे.
डायनॅमिक सिग्नल यंत्रणा सध्या निश्चित वेळेनुसार सुरू असलेले सिग्नल बदलून वाहतुकीच्या प्रत्यक्ष स्थितीनुसार वेळ निश्चित करणारी एआय-आधारित ट्रॅफिक अॅडॅप्टिव्ह कंट्रोल सिस्टम (एटीसीएस) लागू करावी.
सार्वजनिक वाहतुकीला बळ मेट्रो स्थानकापासून नागरिकांना अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी फीडर बस व्यवस्था उभारावी, त्यासोबतच स्वतंत्र सायकल मार्ग विकसित केल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. पार्किंग आणि अतिक्रमणावर कठोर धोरण शहरातील प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये पे-अॅण्ड पार्कची प्रभावी अंमलबजावणी आणि बहुमजली पार्किंगची सुविधा वाढवणे गरजेचे आहे.
Nagpur News : नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
जगातील मोठ्या शहरांनी वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ पारंपरिक पद्धतीने सोडवण्याऐवजी तंत्रज्ञान, नियोजन आणि दीर्घकालीन उपायांचा आधार घेतला आहे. त्यामुळे या शहरांच्या प्रयोगांकडे पाहिल्यास नागपूरसमौर अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे, हे स्पष्ट होते.
टोकियोचा एआय सिग्नल प्रयोग जपानच्या टोकियोमध्ये कॅमेरे आणि सेन्सर्सच्या मदतीने वाहनांची संख्या मोजली जाते. त्यानुसार सिग्नलचा हिरवा वेळ प्रत्यक्ष वाहतुकीच्या स्थितीनुसार बदलला जातो. नागपुरातही काही महिन्यांत सुमारे २० चौकांवरील सिग्नल एआय तंत्रज्ञानाशी जोडले आहेत. मात्र, शहरातील तब्बल ९९ टक्के सिग्नलवर आजही वाहनचालकांना १२० सेकंदापर्यंत लाल दिवा पाहत थांबावे लागते.
सिंगापूरची डिजिटल वाहतूक शुल्क व्यवस्था सिंगापूरने इलेक्ट्रॉनिक
रोड प्रायसिंग’च्या माध्यमातून गर्दीच्या वेळेत अतिवर्दळीच्या भागात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर डिजिटल शुल्क आकारण्याची पद्धत सुरू केली.बार्सिलोनातील ‘सुपरब्लॉक्स’ स्पेनमधील बार्सिलोनाने निवासी भागांची वाहतूक रचना बदलत जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध आणले. परिणामी आतील परिसर पादचारी आणि सायकलस्वारांसाठी अधिक सुरक्षित केला.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत मानसिकतेतच बदल झालेला नाही. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्याचे दावे केले जात असले, तरी आज हजारो कोटींचे चालान प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत केवळ दंडाची व्यवस्था वाढवून समस्या सुटणार नाही, वाहतूक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक कल्पना स्वीकारण्याची गरज आहे.
पूर्वी देशातील पासपोर्ट सेवा अत्यंत खराब असल्याची प्रतिमा होती. मात्र, त्याची जबाबदारी टाटा कंपनीकडे सोपवल्यानंतर सेवेत मोठा बदल झाला. त्याच धर्तीवर वाहतूक व्यवस्थेतही नव्या प्रयोगांचा विचार करणे आवश्यक आहे.