सौजन्य फोटो - AI Gemini
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नाईक हे पत्नी सुनीता नाईक आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होते. जामठा परिसरातील गौसी-मानापूरजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा होता की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात योगेश नाईक, त्यांची पत्नी सुनीता नाईक आणि चार वर्षांचा मुलगा गुलशन नाईक यांना गंभीर दुखापत झाली. मात्र, दुखापतींची तीव्रता अधिक असल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत सहा वर्षांचा तन्मय नाईक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. योगेश नाईक हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते नागपुरात आले होते. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ते कुटुंबासह राहत होते. कामावरून घरी परतत असतानाच हा भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मात्र, अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






