
फोटो सौजन्य सोशलमिडीया
झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासातून त्याने बेरोजगार तरुणांची फळी उभी केली आणि नागपूरसह परिसरात अमली पदार्थांच्या पुरवठ्याची साखळी निर्माण केली. अवघ्या पाच वर्षात त्याने अंमली पदार्थाची खरेदी-विक्री व पुरवठा करणारे कोट्यवधींचे साम्राज्य उभे केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
मुलाने काम करून कुटुंबाला हातभार लावावा, या अपेक्षेने वडिलांनी त्याला भुईमुगाच्या शेंगांचा ठेला लावून दिला होता. मात्र, ठेल्यावर येणाऱ्या काही व्यक्तींच्या संपर्कातून त्याची अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांशी ओळख झाली. सुरुवातीला अमली पदार्थांची ने आण करणे आणि त्यात अन्य पदार्थ मिसळण्याच्या कामासाठी त्याला दोन ते तीन हजार रुपये मिळत असल्याची माहिती तपासात पुढे आली. झटपट मिळणाऱ्या पैशांची चटक लागल्यानंतर शेंगांचा ठेला मागे पडला आणि त्याने कथितरीत्या गुन्हेगारीचा मार्ग पकडला.
पोलिसांच्या तपासानुसार, फल्लीने हळूहळू स्वतः ची यंत्रणा उभी केली. राजस्थान आणि मध्य प्रदेशातून अमली
पदार्थ नागपुरात आणून स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे आणि त्यांच्या पथकाने या कथित साखळीचा माग काढत कारवाई केली. या प्रकरणात त्याच्या सुमारे १७ साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल असून, ६ जणांना अटक करण्यात आली.
फल्लीकडे व्यवहारांच्या नोंदी असलेली डायरी असल्याचेही तपासात पुढे आले आहे. या नोंदींतून अमली पदार्थांचे पुरवठादार, ग्राहक आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी फल्ली वारंवार मोबाइल संच आणि सिमकार्ड बदलत होता.
त्यामुळे त्याच्या हालचालींचा माग काढणे पोलिसांसमोर आव्हान होते. फरार झाल्यानतर बालमैत्रीण सहेली ऊर्फ सोनूसह त्याने कोराडी मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर तामिळनाडूकडे कूच केले.
Nagpur News : जंगलातील संघर्षाला मिळणार नवा योद्धा ‘भीमा’ आणि ‘सुब्रमण्यम’ हत्तींची विदर्भात एन्ट्री
राजस्थानातून आणलेल्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या एमडीमध्ये अन्य पदार्थ मिसळून त्याचे प्रमाण वाढवायचे आणि नागपुरात विक्री करून अडीच ते तीन कोटी रुपये मिळवायचे, अशी योजना असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे. मात्र, या कथित व्यवहाराचा संपूर्ण तपशील आणि त्यातील आर्थिक उलाढाल तपासातून स्पष्ट होणार आहे.
फल्ली शक्यतो स्वतः समोर न येता वेगवेगळे मोबाइल संच आणि क्रमांक वापरून साथीदारांच्या संपर्कात राहत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येते. त्याची बालमैत्रीण सहेली ऊर्फ सोनू आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण, पुरवठादार आणि ग्राहकांची साखळी उलगडण्यासाठी तिची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.