फोटो सौजन्य सोशल मीडिया
काही वर्षांपासून जंगली हत्तीचा कळप विदर्भातील पिकांचे आणि निवासी भागांचे नुकसान करीत आहे. तीन वर्षांपूर्वी जंगली हत्तींचा कळप छत्तीसगडमधून विदर्भात घुसला होता, जो सुरुवातीला गोंदिया येथे थांबला होता. त्यानंतर तो गडचिरोलीमार्गे तेलंगणा येथे गेला.
हा कळप महाराष्ट्र आणि तेलंगणा दरम्यान सतत फिरतो. यावर उपाय म्हणून वन विभाग सर्वसमावेशक व्यवस्थापन आणि नियंत्रण योजना विकसित करीत आहे. आजपर्यंत त्यांचा वापर पेंच आणि आसपासच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या बचाव कार्यासाठी केला गेला आहे.
जंगली हत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भीमा आणि सुब्रमण्यम यांना प्रशिक्षण देण्यासोबतच महावताची सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. जंगली हत्ती त्यांच्या आक्रमकतेसाठी कुप्रसिद्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बेशुद्ध करताना कोणतीही अनुचित घटना पडल्यास जीव धोक्यात येऊ शकतो.
Nagpur Crime : पोलिसांनी उधळला कट ;३ कोटींच्या खंडणीसाठी संचालकाला खोट्या गुन्ह्यात अडकिवण्याचा डाव
पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली येथे हत्ती शिबिर उभारण्यात आले आहे. या शिबिरात सध्या ५५ वर्षीय भीमा आणि २७ वर्षीय सुब्रमण्यम या दोन नर आशियाई हत्तींची देखभाल केली जात आहे. या दोन्ही हत्तींना ‘कुमकी हत्ती’ म्हणून प्रशिक्षित करण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे.
कुमकी हत्ती म्हणजे जंगली हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना सुरक्षितपणे दुसरीकडे वळवण्यासाठी तसेच बचाव मोहिमांमध्ये मदत करण्यासाठी प्रशिक्षित केलेले पाळीव हत्ती. जंगली हत्तींचा मानवी वस्त्यांमधील प्रवेश रोखणे आणि संघर्षाच्या परिस्थितीत वन कर्मचाऱ्यांना मदत करणे, ही त्यांची प्रमुख भूमिका असते.
वन विभागाच्या माहितीनुसार, भीमा आणि सुब्रमण्यम यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कर्नाटकातील अनुभवी माहुत आणि तज्ज्ञांचे पथक पेंच व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही हत्तींना जंगली हत्तींच्या हालचाली समजून घेणे, त्यांना नियंत्रित पद्धतीने दूर नेणे आणि बचाव मोहिमांमध्ये सहभागी होणे याचे प्रशिक्षण दिले जाईल.
विशेष म्हणजे, भीमा आणि सुब्रमण्यम यांना २०२३ मध्ये कर्नाटकातून महाराष्ट्रात आणण्यात आले होते. हे दोन्ही हत्ती मूळचे महाराष्ट्रात पकडण्यात आले होते. मात्र, त्यावेळी योग्य अधिवास आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना कर्नाटकात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही हत्तींचा वापर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे. जंगली हत्तींच्या कळपांना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवणे, संभाव्य संघर्ष टाळणे आणि वन कर्मचाऱ्यांच्या बचाव मोहिमांना मदत करणे यासाठी त्यांची नियुक्ती होईल.
विदर्भात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी भीमा आणि सुब्रमण्यम कितपत प्रभावी ठरतात, याकडे आता वन्यजीवप्रेमी आणि वन विभागाचे लक्ष लागले आहे.






