नागपूर-पुणे रेल्वे हाऊसफुल्ल; दिवाळीपूर्वीच तिकिटांचा 'शॉर्टेज'
नागपूर : दिवाळीच्या काळात पुणे ते नागपूर रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर आरक्षण आत्ताच करून ठेवणे आवश्यक आहे. कारण सणापूर्वी तब्बल दोन महिने आधीच रेल्वे तिकिटांची टंचाई जाणवू लागली आहे. यंदा दिवाळी 21 ऑक्टोबर साजरी होणार असून, 17 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत पुणे-नागपूर गाड्या आणि 23 ते 26 ऑक्टोबर दरम्यान नागपूर-पुणे तसेच पुणे-नागपूर मार्गावरील गाड्यांमधील जागा हाऊसफुल्ल धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 ऑगस्टला उद्घाटन केलेली पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस (२६१०१/०२) फक्त दोन महिन्यांतच पूर्णपणे भरली असून, या ट्रेनला रोजच मोठी मागणी असते. 8 डब्यांची ही गाडी रुळावर येताच हाऊसफुल्ल होते. बरेचदा तिकीट मिळणे कठीण होते इतकी मोठी प्रतीक्षा यादी असते. यावरून स्पष्ट होते की, या मार्गावर प्रवाशांची मागणी किमी मोठी आहे. अर्थातच या गाडीला 8 ऐवजी 16 डबे जोडले तरी ती यशस्वीपणे धावेल असे दिसते.
दिवाळीपूर्वीच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेले असताना मध्य रेल्वेने अजूनही पुणे-नागपूर दरम्यान विशेष गाडीची घोषणा केलेली नाही. रेल्वे प्रशासन दरवर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवते, पण त्या अनेकदा प्रवाशांच्या सोयीप्रमाणे नसतात. बऱ्याचदा गाड्या अशा तारखांना चालवल्या जातात, जेव्हा त्यांची फारशी गरज नसते आणि ज्या दिवशी खूप गर्दी असते. त्या दिवशी गाड्या उपलब्ध नसतात.
विशेष गाड्या चालवणे गरजेचे
फक्त आकडेवारी पूर्ण करण्यासाठी नाही तर खरंच जनतेच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या पाहिजेत. कारण सणासुदीच्या काळात विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यापारी आणि कुटुंबासोबत प्रवास करणारे लोक वेळेवर गाड्या न मिळाल्याने अडचणीत सापडतात. त्यामुळे बरेच जण विमान किंवा खासगी बसचा आधार घेतात, पण त्यांचे भाडे अनेक पटीने जास्त असते.
काळाबाजार आणि दलालांची मुजोरी
खिडकीवर तिकिटे उपलब्ध होताच दलाल सक्रिय होतात आणि त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. सणांच्या काळात प्रवाशांना जास्त दराने तिकिटे विकण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. रेल्वेने वेळेवर पुरेसे डबे किंवा विशेष गाड्या उपलब्ध केल्या नाहीत, तर ही समस्या आणखी गंभीर होणार हे निश्चित आहे.