
Nanded was previously considered a Congress stronghold, but now the public opinion is mixed
Nanded Political News : नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकांचे निकाल (Local Body Elections) म्हणजे केवळ विजय-पराभवाची आकडेवारी नसून, जिल्ह्याच्या राजकारणाला दिलेला स्पष्ट इशारा आहे. गेली अडीच-तीन दशके काँग्रेसचे अभेद्य मानले जाणारे नांदेडचे (Nanded News) राजकीय वर्चस्व आता पूर्णपणे ढासळत असल्याचे या निकालांनी ठसठशीतपणे दाखवून दिले आहे. सत्ता आता कोणाच्याही खिशात नाही. मतदारांनी प्रत्येक आमदार, पक्ष आणि नेत्याला स्वतंत्रपणे गुण दिले आहेत आणि उणे गुणही.
भाजपात प्रवेशानंतरची खासदार अशोक चव्हाण यांची पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. निकाल पाहता मतदारांनी त्यांना मिश्र कौल दिल्याचे स्पष्ट होते. काही ठिकाणी भाजपचा प्रभाव वाढताना दिसला, तर काही मतदारसंघांत कच्चे दुवे उघडे पडले. मुखेडमध्ये आमदार तुषार राठोड, किनवटमध्ये आमदार भीमराव केराम आणि धर्माबादमध्ये आमदार राजेश पवार यांना मतदारांनी स्पष्ट झटका दिला. हे निकाल स्थानिक असंतोष आणि संघटनात्मक मर्यादा अधोरेखित करणारे ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) साठी मात्र हे निकाल आत्मविश्वास वाढवणारे ठरले. लोहा नगरपरिषदेत आमदार
प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, कंधार नगरपरिषद काँग्रेसकडे गेल्याने त्यांनाही आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. देगलूरमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवत जितेश अंतापुरकर यांना स्पष्ट संदेश दिला येथे केवळ नाव नव्हे, तर काम महत्त्वाचे ठरते.
हे देखील वाचा : मुंबईत थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनपूर्वी पालिकेचा ‘फायर अलर्ट’! हॉटेल्स, पब आणि मॉल्सवर धाडी; ७३१ आस्थापनांची तपासणी
अपक्ष भाजपाकडे?
हदगाव नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाकडे गेल्याने आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांची बाजू भक्कम झाली असली, तरी त्याच मतदारसंघातील हिमायतनगर काँग्रेसकडे गेल्याने राजकीय समतोल ढासळलेला दिसतो. शिवसेना (शिंदे गट) ने दोन ठिकाणी यश मिळवले, तर उद्धव ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
भाजपाला वेट तीन-नगरपरिषदात यश मिळाले असने तरी धर्माबाद व बिलोली येथील अपक्ष नगराध्यक्ष भविष्यात भाजपकडे झुकण्याची शक्यता असल्याने चित्र थोडे विस्तारलेले आहे. तरीही, भाजपासाठी हे निकाल आत्मसंतोषाचे नाहीत, तर संघटन मजबूत करण्याचा इशारा आहेत.
हे देखील वाचा : RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”
एकूणच, या निकालांनी काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना कठोर आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. नांदेडचे राजकारण आता एका नेत्याभोवती फिरणारे राहिलेले नाही. मतदार जागरूक आहे, पर्याय शोधतो आहे आणि प्रत्येक निवडणुकीत नया निकाल देण्यास तयार आहे.