
३ लाख अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत, ९ दिवसात केवळ ७८ कोटी रुपये वितरित
नाशिक : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून ३१७ कोटी १५ लाख ७६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. या मंजूर रकमेपैकी मागील ९ दिवसात केवळ ७८ कोटी रुपयांची मदत वितरित झाली आहे. यामुळे अद्यापही जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ६०८ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे.
सप्टेंबर महिन्यात राज्यभरात अतिवृष्टीने थैमान घातले. यात जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ९०२ शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले. या पंकज अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी ३१७ कोटी १५ लाख ७६ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून या मदतीचे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना वाटप केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु हे आश्वासन फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनकडून २० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु मागील ९ दिवसात केवळ १ लाख १३ हजार २९४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७८ कोटी ४२ लाख ३३ हजार रुपये इतकी मदत जमा झाली आहे. त्यामुळे अद्यापही ३ लाख ५ हजार ६०८ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. या आतीत शेतकऱ्यांना सरकारने मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज असताना, तुटपुंज्या स्वरूपाची रक्कम जाहीर केली. ती देखील खात्यात जमा होण्यास उशीर होतोय. ई केवायसी, फार्मर आयडी, बैंक अकाउंटच्या समस्या, सातत्याने बंद असणारे सर्वर, मनुष्यबळाचा अभाव या तांत्रिक बाबींमुळे मदत रखडली. सरकारचे हे अपयश आहे. तांत्रिक दोष दूर करून शेतक-यांना तात्काळ मदत मिळावी, असे कृषीतज्ज्ञ सचिन होळकर यांनी म्हटले आहे.