कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक!
कर्जत: कर्जत तालुक्यात भाताचे जवळपास ९० टक्के पीक हे सततच्या पावसामुळे पूर्णपणे खराब झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक शेतात साचलेल्या पाण्यात भिजत असल्याने झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन शेतकरी कर्जत तहसील कार्यालयात आक्रमक झाले होते. संतप्त शेतकऱ्यांनी शासनाकडे ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी तालुक्यातील शेती पिकाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी मान्य केली आहे. उद्यापासून (२६ ऑक्टोबर) तालुक्यात सरसकट पंचनामे केले जातील, असे आश्वासन डॉ. जाधव यांनी दिले आहे.
गेले महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भाताचे पीक शेतातच कोसळले असून, कापून ठेवलेले भाताचे पीक पाण्यात भिजत असल्याने शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. यावर्षी भाताचे एकूण क्षेत्र साधारण ६००० हेक्टर होते, त्यापैकी ५३०० हेक्टर जमिनीचे नुकसान सततच्या पावसामुळे झाले आहे.
या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी तहसीलदार यांचे न्यायालयीन कामकाज सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही काळ कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले. त्यानंतर, न्यायालयाचे कामकाज थांबवून तहसीलदारांनी शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आपली बाजू मांडली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार कधी बघणार, अशी खंत व्यक्त केली.
त्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी चंद्रकांत मांडे, बाळू थोरवे, मनोहर पिंगळे, बजरंग श्रीखंडे, वैशाली ठाकरे, अशोक थोरवे, सुरेश ठोंबरे, सुदाम हाबळे, तसेच उत्तम, विश्वनाथ घारे, अंकुश शेळके, मयूर पाटील, महादू निकामी, मधुकर जाधव, रामचंद्र राऊत, चंद्रकांत भुसारी, तुकाराम थोरवे, पदमाकर मोकाशी, राजेश ठाकरे, राजाराम बार्शी, नरेश भोईर, उदय चव्हाण, पंढरीनाथ तळपे, विलास भगत, भास्कर मुने, रवींद्र मांडे, नामदेव मोदक आदी शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
१. नुकसानग्रस्त भातपीक शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान (नुकसान भरपाई) देण्यात यावे.
२. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन भाताच्या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत.
यावेळी तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी उद्या कृषी अधिकारी, कृषी सहायक आणि तलाठी यांची बैठक बोलावली असून, तालुक्यात ५२६५ शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत, मात्र उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने केले जातील, असे आश्वासन दिले.
Karjat News : कर माफीच्या अभय योजनेत मुदतवाढ करा ; शिवसेनेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन






