
फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान
सिन्नर : फार्मर आयडी नसणे, फार्मर आयडी असला तरी सातबारा उतारावरील नाव आणि आधारवरील नाव न जुळणे, ई केवायसी प्रलंबित असणे आदी कारणांमुळे नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या जाचक अटींबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १४,७०५ पैकी केवळ ६३५९ शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. ई केवायसी झाल्यानंतरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वर्ग होणार आहे. त्यातही ई केवायसीचे सर्वर बंद पडल्याने आता ते कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या सिन्नर तालुक्यातील १४७०५ शेतकऱ्यांच्या १०६१६ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. या शेतकऱ्यांना १० कोटी ९३ लाख पाच हजार रुपये इतक्या रकमेच्या नुकसान भरपाईची मागणी नोंदवण्यात आली होती. नुकसानग्रस्त १४७०५ पैकी १२५८९ शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत झाली आहे.त्यांना ९ कोटी १४ लाख ४५ हजार ९०९ रुपयांची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. २९ ऑक्टोबर अखेर त्यापैकी ६३५९ शेतकऱ्यांना ४ कोटी ५५ लाख ३८४६ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
सोयाबीन व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आल्यानंतर ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान असलेल्या १०६१६ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे करून त्यासाठी १० कोटी ९३ लाख ५ हजार रुपये इतकी रक्कम निर्धारित करण्यात आली होती.
फार्मर आयडी नसलेले व केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असे १५१३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपलोड करणे बाकी आहे. प्रशासनाकडून आवाहन करूनही अनेक शेतकऱ्याऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी केली नाही. आता नुकसान भरपाई मिळावी म्हणून हेच शेतकरी फार्मर आयडीसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. शासन स्तरावरून सुरुवातीला फार्मर आयडीची अट टाकण्यात आली होती. बहुतेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अप्रूव्ह असतानाही केवायसी प्रलंबित दाखवत असल्याने नुकसान भरपाई अनुदान जमा झालेले नाही.
आयडी असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे फार्मर आयडी प्रक्रिया शक्य झाली नाही. त्यांच्यासाठी ई केवायसीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ३३ टक्केच्या वर शेतीपिकांचे नुकसान असलेल्या प्रत्येक शेतक-यासाठी भरपाईची मागणी करण्यात आली आहे. प्रलंबित शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्यात सुरू आहे, अशी माहिती सिन्नर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली.