दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त, मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; परराज्यातील दोघांना पोलीस कोठडी
बुधवारी (29 ऑक्टोबर) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा बाळगून विक्री करण्याच्या हेतूने येणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चौधरी व कर्मचाऱ्याऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुंबई- आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर दोन इसम संशयास्थदरित्या आढळून आले. दोन्ही इसमांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना थांबवून पोलिसांनी विचारपूस केली, संशयित आरोपी नाजिर अकरम मोहम्मद अय्यूब अन्सारी (३४, रा. मोमिनपुरा, बुरहानपुर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (३३. रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. ३१, बुरहानपुर, मध्य प्रदेश) यांची तपासणी केली.
तपासणीत त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रूपये दराच्या २००० बनावट नोटा, तसेच दोन मोबाईल, चॉकलेटी-काळी सॅक (बंग) असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३(७) अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
दोघे संशयित हे परप्रांतीय असून, सदरच्या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या व कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याबाबत तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे करीत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग यशवंत बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिति सार्वजी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलीस हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, गणेश जाधव, मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.






