
डॉ. आंबेडकरांच्या नाव न घेतलेल्या गोंधळावर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण (Photo Credit- X)
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहणानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थितांना संबोधित करत होते. भाषणादरम्यान त्यांनी विविध महापुरुषांचा उल्लेख केला, मात्र संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव त्यांच्याकडून सुटले. हे लक्षात येताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट व्हीव्हीआयपी कक्षाकडे धाव घेतली आणि घोषणाबाजी सुरू केली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माधवी जाधव यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या बाबासाहेबांचे नाव भाषणात का नाही? मी त्यांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पालकमंत्र्यांनी त्यांची चूक मान्य करावी”.
या संपूर्ण गोंधळानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझ्याकडून अनावधानाने नाव राहिले असेल, माझा तसा कोणताही हेतू नव्हता. मी भारत माता की जय, वंदे मातरम् आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. मुद्दाम कोणाचे नाव डावलण्याचा प्रश्नच येत नाही. मी या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो”.
सरकारी सेवेत असताना अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात मंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणणे आणि घोषणाबाजी करणे, याला प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. शिष्टाचार आणि शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी माधवी जाधव यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि वन विभाग या घटनेचा सविस्तर अहवाल तयार करत आहेत.
Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात