Devendra Fadnavis: गेले काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीत तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोचले आहेत. या भेटीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील याबाबत त्यांचे कान टोचले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना सुनावले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अजित पवार यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
रमी प्रकरणावरून कोकाटेंवर सडकून टीका
रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शरद पवार गटाने देखील कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादांनी ‘माणिक’ नाही,
शोधलाय ‘सागरगोटा’..
त्यामुळे बळीराज्याचा झालाय मोठा ‘तोटा’
ओसाडगावच्या पाटलांनी जुगारातून केला पैसा ‘मोठा’..!
अशा प्रकारे चारोळी करत शरद पवार गटाने अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी नव्हे तर शासन भिकारी आहे वादग्रस्त विधान केले. यावरून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या दौऱ्यावरून त्यांना सुनावले होते. कोकाटे यांनी असे विधान केले असल्यास आमच्यासाठी ते भूषणावह नाही असे फडणवीस म्हणाले होते.
अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. माझी आणि त्यांची अजून भेट झालेली नाही. पण सोमवारी त्यांची आणि माझी भेट होईल, असे अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेले आहे की आपण नेहमी भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे असे स्पष्टपणे आम्ही तिन्ही नेत्यांनी सूचना दिलेल्या आहेत.