
अजित पवारांना मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
सातारा/ मारुती पवार : सध्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून, प्रत्येक पक्षातील राजकारणी आपल्या पक्षात इनकमिंग करण्यात मग्न आहेत. त्याचाच प्रत्यय खटाव- माण तालुक्यात ऑपरेशन लोटस दिसून आला. खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, काही गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. निवडणुका ह्या एकत्र लढणार की वेगवेगळ्या लढणार यावर अजून चर्चा झालेली नसून, महायुती मधील पक्षांमध्येच आपापल्या पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची रस्सीखेच सुरू आहे.
महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भाजपाच्या गळाला लागले असून, निमसोड गटात राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांना शह देण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी ही व्ह्यू रचना केलेली दिसून येत आहे. खरं पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकासआघडी अशी लढत होणे गरजेचे आहे परंतु घटक पक्षातीलच कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्याची चढाओढ लागलेली दिसून येत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक गटात भक्कमपणे भाजपा आपले पाय रोवत असल्याचे दिसून येत असून, आगामी निवडणुकांत आपल्याच विचाराचा जिल्हा परिषद व पंचायत समितीत उमेदवार असावा, अशी धारणा भारतीय जनता पार्टीने केलेली दिसून येत आहे.
इच्छा आकांक्षा वाढल्यामुळे भाजपात प्रवेश
धोंडेवाडीचे माजी सरपंच हनुमंतराव भोसले यांनीही कमळ हाती घेतले असून, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते, परंतु त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला. खरं पाहिलं तर धोंडेवाडी गावावर रणजितसिंह देशमुख यांची एकहाती सत्ता होती. परंतु गेल्या काही वर्षात या ठिकाणी दोन गट पडलेले दिसून येत आहेत. हनुमंतराव भोसले यांनी एका गटाचे नेतृत्व केले होते. दुसरा गट त्यांच्यातूनच फुटून भाजपामध्ये गेला होता. गेल्या काही वर्षात या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु आज दोन्ही गट एकत्र होऊन मागील सर्व संघर्ष विसरून एकत्र काम करणार का हेही पाहणे रंजक ठरणार आहे.