
नेपाळमधील पूर-भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकले; केंद्राच्या संपर्कात राज्य सरकार, 4 जणांशी संपर्क
नेपाळ-तिबेट परिसरात भूकंप, पूर आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. या भागात पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत 80 नागरिकांची माहिती प्रशासनाकडे प्राप्त झाली असून चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला आहे. हे चारही पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. नेपाळमधील काही भागांमध्ये मोबाईल नेटवर्क आणि दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्यामुळे पर्यटकांशी संपर्क साधताना अडचणी येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.
रिचर्ड टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन वाहनांमधून काही पर्यटक मानस सरोवर येथे गेले आहेत. त्यापैकी एका वाहनातील जवळपास 37 पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पूर आणि भूस्खलनामुळे दळणवळण व्यवस्था प्रभावित झाल्याने उर्वरित पर्यटकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांकडून या पर्यटकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिक किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे संबंधित पर्यटकांबाबत अतिरिक्त माहिती असल्यास ती प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हेल्पलाइन: 1070 (टोल-फ्री)
नियंत्रण कक्ष: +91-9321587143
ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंबीयांनी उपलब्ध ऑनलाइन लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.