फोटो सौजन्य: iStock
दीपक गायकवाड/मोखाडा: तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट सेवा ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मात्र भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ची नेटवर्क सेवा सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे असंख्य ग्राहक त्रस्त झाले आहेत. विशेषतः पालघरसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्रतेने जाणवत असून, अनेकदा सलग १५ दिवसांहून अधिक काळ नेटवर्क गायब राहत असल्याचे दिसून येत आहे.
खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या सेवेची किंमत कमी असूनदेखील, त्याच्या तांत्रिक अडचणी आणि नेटवर्क विस्कळीतपणा यामुळे ग्राहकांचा विश्वास ढासळला आहे. ग्राहकांकडून वारंवार तक्रारी करूनही बीएसएनएलकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. परिणामी, बँका, शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आणि इतर संस्थांना याचा फटका बसत आहे.
Pune News: मानाचा चौथा गणपती असलेले तुळशीबाग गणपती मंडळ साकारणार ‘मथुरेतील वृंदावन’
मागील दोन वर्षांपासून बीएसएनएलची सेवा कोलमडलेली असून, अनेकदा कार्यालयीन व्यवहार ठप्प होतात. श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र यानंतरही सेवा सुरळीत न झाल्यामुळे ग्राहकांची नाराजी आणखीनच तीव्र झाली आहे.
बीएसएनएल ही देशातील जुनी आणि विश्वासार्ह सरकारी संस्था असूनही आजच्या स्पर्धात्मक युगात तिची गुणवत्ता घसरत चालली आहे. सरकारच्या उदारीकरण धोरणानंतर खासगी कंपन्यांनी (जिओ, एअरटेल, व्होडाफोन इत्यादी) आपली सेवा ग्रामीण भागातही पोहोचवली असून त्यांच्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत.
खोडाळा येथील बीएसएनएल ग्राहक शाकीर हैदर शेख यांनी आपला अनुभव शेअर करत सांगितले, “इतर सेवांच्या तुलनेत बीएसएनएल परवडते, पण ₹199 च्या मासिक रिचार्जमध्ये १५ दिवस सेवा मिळत नाही. त्यामुळे ते पैसेही वाया जातात. म्हणूनच मी आजच माझे बीएसएनएल सिम एअरटेलमध्ये पोर्ट केले आहे.”
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बीएसएनएलची अखंड, जलद आणि विश्वासार्ह सेवा अत्यंत गरजेची आहे. मात्र सध्याच्या स्थितीत कंपनीचा कार्यप्रदर्शन फारच निराशाजनक ठरत असून, वेळेत सुधारणा न झाल्यास बीएसएनएलचा ग्राहकवर्ग पूर्णपणे अन्य सेवांकडे वळेल, हे नक्की.