पुणे गणेशोत्सव 2025 (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) असून यंदाच्या गणेशोत्सवात मथुरेतील वृंदावन साकारण्यात येणार आहे. या सजावटीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सवात सार्वजनिक स्वरूपातील विधायक उपक्रम नेहमीच राबवले जातात. परंतु त्याची दखल घेतली जात नाही. याउलट, एखादी वाईट घटना घडली, तर मात्र तिची लगेच दखल घेतली जाते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतरही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विधायक उपक्रमांची परंपरा जपली आहे. हा उत्सव केवळ दहा दिवसांचा नसतो, तर गणेशोत्सव मंडळांच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्याचे देशभरातून कौतुक होते, असेही त्यांनी सांगितले.
कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, सन १९५२ सालापासून गणेशोत्सवात धार्मिक व पौराणिक देखाव्यांची परंपरा असणारे श्री तुळशीबाग मंडळ यंदाच्या वर्षीही आकर्षक मथुरेतील वृंदावन या संकल्पनेतून देखावा सादर करणार आहे. तब्बल ८० फूट रुंद १२० फूट लांब ३५ फूट उंच असा भव्य देखावा होणार आहे. त्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराच्या १४ पॅनल आणि जवळपास ३० मोर या वृंदावन देखाव्यात विहार करणार आहेत. राधा कृष्णाचे मंदिर २० फूट लांब आणि ४० फूट उंच असे भव्य प्रवेशद्वार या देखाव्यात असणार आहे. सरपाले बंधू सदर देखाव्याची निर्मिती करत आहे.
यंदा दगडूशेठ गणपतीला पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा; मंदिर सजावटीचे वासापूजन संपन्न
यंदा दगडूशेठ गणपतीला पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा
पुण्यातील गणेशोत्सव फक्त देशात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची बीजे पेरलेल्या पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव सोहळा आणि विसर्जन मिरवणूक ही अत्यंत लोकप्रिय आहे. मानाचे गणपती आणि पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लांबून भक्तगण येत असतात. दगडूशेठ गणपतीची आरास आणि डेकोकेशन हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो.
पुण्यातील लोकप्रिय दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बारामाही भाविक येत असतात. गणेशोत्सव काळामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीला केलेला भव्य देखावा हा नेत्रदीपक असतो. यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीचे १३३ वे वर्षे आहे. या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वासा पूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला.