मुंबई : सध्या अनेक राज्यांत बिपरजॉय चक्रीवादळाची (Biporjoy Cyclone) चिंता सतावत आहे. त्यात आता बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Climate) वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे 25 ते 30 किलोमीटर ताशी वेग यातून सध्या भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून 600 किमी पश्चिमेकडून संथ गतीने (ताशी तीन किमी) प्रवास करीत असून, रविवारपर्यंत ते अत्यंत तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे भागात बिपोरजॉय वादळातील अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी 25 ते 30 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम या भागात जाणवेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुढील 12 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. पण या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव
बिपरजायचा प्रभाव येत्या 36 तासांत देशातील चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे.