डोंबिवली:डोंबिवली (Dombivali) जवळील ग्रामीण भागात असलेल्या घारीवली परिसरातील अर्जुन एम्पायर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह (Old Woman Death) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिता पाटील असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेची हत्या (Murder For Theft) झाल्याचा संशय असून या प्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. (Dombivali Crime)
डोंबिवली पूर्वेकडील घारीवली परिसरात असलेल्या अर्जुन एम्पायर इमारतीमध्ये अनिता पाटील ही 65 वर्षांची महिला एकटीच राहत होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनिता यांना तिच्या मुलीने फोन केला मात्र अनिता यांनी फोन उचलला नाही. बराच वेळ फोन उचलला न गेल्याने त्यांच्या मुलीला संशय आला. मुलीने तत्काळ आपल्या आईच्या घरी धाव घेतली. घराचा दरवाजा ठोठावला मात्र दरवाजा न उघडल्याने दुसऱ्या बाजूस असलेल्या खिडकीतून तिने आत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर जे चित्र दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला. कारण समोरच त्यांना अनिता यांचा मृतदेह दिसला. त्यांच्या अंगावरील दागिनेदेखील गायब होते.
या प्रकरणी मानपाडा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान चोरीच्या उद्देशाने अनिता यांची हत्या झाल्याचा आरोप अनिता यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अनिता यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.