
फोटो सौजन्य: Gemini
संत्रीबागांमधून मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी आर्थिकदृष्ट्या समाधानी आहेत. त्यामुळेच संत्र्याखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. संत्री हे कमी पाण्यात आणि तुलनेने कमी खर्चात येणारे पीक असून, या भागातील डोंगराळ जमीन संत्री लागवडीसाठी अत्यंत अनुकूल ठरत आहे. यामुळे पाथर्डी तालुक्याचा पश्चिमेकडील दुष्काळी व डोंगराळ भागात गेल्या सात वर्षांत फळपिकांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
Ahilyanagar News: माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांची वाढलेली आवड यामुळे या दुष्काळी भागात सातत्याने फळबागांची लागवड होत आहे. सध्या तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर संत्री, मोसंबी, डाळिंब, सीताफळ आणि पेरू यांसारखी फळपिके घेतली जात आहेत.
कोरोनाच्या काळात लोकांमध्ये संत्र्याची मागणी वाढली होती. त्या काळात संत्री ३० ते ३५ रुपये किलो दराने विकली जात होती. त्यानंतर दरात सातत्याने वाढ होत गेली असून, सध्या संत्री ७० ते ७२ रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे संत्री हे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘पैसा कमावून देणारे पीक’ ठरत आहे.
दरवर्षी सात ते आठ टक्के क्षेत्र नव्याने फळबागांखाली येत असल्याची माहिती करंजी मंडळ कृषी अधिकारी संकेत कराळे आणि तालुका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांनी दिली.
संत्री व्यापारी भाऊसाहेब टेमकर म्हणाले, “गेल्या सहा वर्षांपासून मी संत्र्यांचा व्यापार करत आहे. मागणी सातत्याने वाढत आहे आणि भावही चांगले मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतोय आणि आम्हालाही त्या मानाने समाधानकारक कमिशन मिळत आहे.”
प्रगतशील शेतकरी प्रदीप टेमकर (रा. भोसे) यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, “संत्री पीक आता शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरू लागले आहे. सात वर्षांपूर्वी मी ५०० झाडांची बाग केवळ दोन लाख रुपयांपासून विकायला सुरुवात केली होती. यावर्षी तीच बाग ३५ लाख रुपयांना विकली. या पिकामुळे माझ्या कुटुंबाची मोठी आर्थिक प्रगती झाली आहे.”