99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (फोटो- सोशल मीडिया)
सातारा जिल्ह्यात सुरू आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
संमेलनात पार पडला ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत
तंत्रयुगामध्ये ग्रामीण साहित्याची चळवळ लोप पावल्याची भावना
सातारा: साहित्यातून, समीक्षाव्यवहारांतून प्रकट होणारे स्त्रीरूप, पुरुषी नजरेने पाहिलेले आहे. वास्तवातील स्त्रीकडेही पारंपरिक पुरुषी नजरेनेच पाहिले जाते. स्त्रीला विशिष्ट चौकटीत, मर्यादेत अडकवणारी स्त्री प्रतिमा शतकानुशतके घडविण्यात आली आहे. ही ‘घडवलेली’ स्त्री प्रतिमा तसेच घडवलेला स्त्रीवाद तोडणे गरजेचे आहे. त्याशिवाय स्त्रीवाद मूळ स्वरूपात प्रकट होऊ शकणार नाही, अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी सातारा येथे केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तिसऱ्या दिवशी (दि. ३) साहित्य अकादमी सन्मानप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्य मंडपात झालेल्या या मुलाखतीत प्रसिद्ध समीक्षक डॉ. रणधीर शिंदे आणि प्रवीण बांदेकर यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. प्रारंभी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार तसेच दादा गोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
स्त्रीवादाचा विचार व्हावा..
पाटील म्हणाल्या, ७०च्या दशकात जागतिक स्तरावर मांडला गेलेला स्त्रीवाद तसेच स्त्रीमुक्तीच्या चळवळींकडे आपण स्थानिक दृष्टीने पाहिले पाहिजे. आपल्या वर्ग, वंश, धर्म, भाषा आणि जातींच्या जाणिवा तसेच आपली सामाजिक व सांस्कृतिक जडणघडण आणि स्त्रीवादाचे पाश्चात्त्य रूप, यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे आपल्या स्त्रियांच्या संदर्भात आपण स्त्रीवादाचा विचार केला पाहिजे. समानता, समान वेतन, कामाची समान विभागणी, समान वेळा आणि मानवतेची भूमिका असणारा स्त्रीवाद आपल्याला अपेक्षित असावा. जो देशी रूपातला असेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेत पुरुषांनीच घडवलेला स्त्रीवाद आणि चित्रित केलेली साहित्यातील स्त्री प्रतिमा, आपल्या जाणिवा प्रगल्भ रीतीने व्यक्त झाल्याशिवाय तोडणे अवघड आहे. अन्यथा आपल्या तथाकथित रणरागिण्या नऊवारी नेसून मोटरसायकल रॅली काढण्यापुरत्या आणि मंगळसूत्र महोत्सव साजऱ्या करण्यापुरत्याच राहतील, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
ग्रामीण साहित्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण, तंत्रयुगामध्ये ग्रामीण साहित्याची चळवळ लोप पावलेली दिसते. काळाचे भान न बाळगता, गावागावातल्या वाड्यावस्त्यांमधले उपेक्षितांचे जगणे देशोधडीला लागले, पण त्याविषयी ग्रामीण साहित्यात अक्षरही उमटले नाही, त्या समूहांचे चित्रणच दिसत नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील स्त्रिया हा चिंतेचाच विषय असून, ठराविक घराण्यांमधील स्त्रियांनाच थोडी संधी मिळते. राजकीय पटलावर त्याही पुरुषांसारख्याच होत जातात, त्यांची मानसिकता तशीच होत जाते, अशी टीका पाटील यांनी केली.
आत्मनिष्ठेकडून समूहनिष्ठेकडे..
मी एक स्त्री म्हणून व्यक्त होत असताना, स्वाभाविकच माझी कविता स्त्रीकेंद्री होणे अपरिहार्य आहे. तरीही वय, वातावरण, भोवताल, परिस्थिती यानुसार अनुभव आणि जाणिवांच्या पातळ्या विस्तारत जाताना, माझ्या कवितेचा स्वर प्रसंगी आत्मनिष्ठ, अंतर्मुख होतो. आवश्यक तेव्हा राजकीय संदर्भ, सामाजिक जाणिवा, सामाजिक अन्याय, असंतोष, अत्याचारांच्या घटना, शेतकरी आत्महत्या अशा प्रसंगी बहिर्मुख होतो आणि माझी कविता आत्मनिष्ठेकडून समूहनिष्ठेपर्यंतचा प्रवास करत जाते, असे पाटील म्हणाल्या. कवितालेखनात उत्स्फूर्तता ८० टक्के तर सुमारे २० टक्के भाग कारागिरीचा असू शकतो, पण कविता सुचल्याशिवाय मी कधीच लिहीत नाही. मात्र, कविता सुचत असताना, जेव्हा स्त्रीला त्या निर्मितीप्रक्रियेकडे दुर्लक्ष करत, सांसारिक कामे प्राधान्यक्रमाने उरकावी लागतात आणि सुचलेली कविता विरून जाते, त्या सृजनक्षणांचे गमावलेपण कमालीचे दुःखदायक ठरते, असे त्या म्हणाल्या.
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
वारी परंपरा, भक्ती संप्रदाय, ईश्वरी शक्ती यांचे उपरोधिक उल्लेख कवितेत येतात, याची कारणे वेगवेगळी आहेत. काही वैयक्तिक दुःखद प्रसंग आहेत तर बहुतेक सामाजिक दुःखे व समस्यांची मुळे आहेत. अनेकदा वैयक्तिक अनुभव आणि सामाजिक जाणिवा तसेच वास्तव यांची सरमिसळ होऊन, कवितेचा उद्गार उपरोधिक उमटतो. लहानपणी मी वारीसाठीही कर्ज काढणारी आणि ते फेडता न येणारी मंडळी पाहिली आहेत. शेतकरी, अभावग्रस्त माणसे कर्ज काढून वारी करतात आणि आत्महत्या कर्जांभोवती फिरतात, हे आपण पाहतो. या साऱ्याचा परिपाक म्हणून कवितेत उपरोध येतो, असे त्यांनी सांगितले.
मोठे लेखकही स्त्रीविषयी संकुचितच..
आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती इतकी रुजली आहे, की साहित्यातली आणि वास्तवातली, अशा दोन्ही स्त्रीप्रतिमा पुरुषांनीच त्यांना अपेक्षित अशा घडवल्या आहेत. स्त्रीला कुठलेच स्वतंत्र, समान व्यक्तिमत्व नाही. अगदी जी. ए. कुलकर्णी, नेमाडे, महानोरांसारखे मोठे लेखकही याला अपवाद नाहीत. आई, बहीण या नात्यातली स्त्री त्यांनी चित्रित केली आहे, पण स्त्री, प्रेयसी, पत्नी या रूपात त्यांनी संकुचित पुरुषी मानसिकता दाखवून दिली आहे. त्या तुलनेत नारायण सुर्वेंनी चित्रित केलेले स्त्रीरूप मला अधिक मानवी आणि नैतिक वाटते, असे मत अनुराधा पाटील यांनी मांडले.






