
Otur ST Bus Stand, Junnar News,
ओतूर हे गाव पुणे, अहमदनगर आणि नाशिक (Nashik) या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. माळशेज घाटातून येणारी वाहतूक आणि पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा दुवा म्हणून या बस स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोज हजारो विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार या स्थानकाचा वापर करतात. मात्र, आजमितीस येथे किमान मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागत आहे. (Pune News)
केवळ दुरुस्ती नको, तर सर्व सोयींनी युक्त ‘अद्ययावत बस पोर्ट’ उभे राहावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.सध्या बस स्थानकाच्या आवारात पावसानंतर चिखलाचे साम्राज्य पसरते, तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास होतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून संपूर्ण बस स्थानक परिसराचे दर्जेदार सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. प्रवाशांना बसण्यासाठी आधुनिक बाकडे, थंड व शुद्ध पिण्याचे पाणी आणि अत्याधुनिक स्वच्छता गृह व स्नानगृह यांची उपलब्धता ही काळाची गरज आहे.
ओतूर येथे केवळ इमारत न बांधता, सर्व सुखसुविधांनी युक्त असे ‘बहुउद्देशीय अद्ययावत बस स्थानक’ उभारावे, अशी जोरदार मागणी ओतूरकर आणि परिसरातील ३० ते ४० गावांतील प्रवाशांनी केली आहे.
ओतूर हे गाव कल्याण-नगर महामार्गावरील मोक्याचे ठिकाण आहे. येथून दररोज शेकडो बस फेऱ्या पुणे, मुंबई , नाशिक, अहमदनगर आणि माळशेज घाटातून मुंबई व कोकणात जातात. मात्र, इतक्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांना आत उभे राहणे कठीण होते.
अस्वच्छता व दुर्गंधी: प्रसाधनगृहांची अवस्था इतकी भीषण आहे की महिला प्रवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.तर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असते.
स्थानिक प्रवाशांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे खालील मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
१. दोन शिफ्टमध्ये कंट्रोलरची नियुक्ती:
सध्या ओतूर स्थानकात गाड्यांच्या वेळापत्रकाचा मोठा बोजवारा उडाला आहे. चालक-वाहक अनेकदा स्थानकात गाडी न आणता महामार्गावरूनच निघून जातात. प्रवाशांना माहिती देण्यासाठी आणि गाड्यांचे नियोजन करण्यासाठी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दोन शिफ्टमध्ये ‘कंट्रोलर’ (वाहतूक नियंत्रक) असणे अनिवार्य आहे.
२. रिझर्वेशन आणि पार्सल सुविधा:
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ओतूरकरांना इतर मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. स्थानकातच ‘संगणकीय आरक्षण खिडकी’ सुरू केल्यास प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच, ओतूर ही मोठी बाजारपेठ असल्याने ‘एसटी पार्सल सेवा’ अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
३. शुद्ध पिण्याचे पाणी आणि नवीन टाक्या:
सध्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या गंजलेल्या आणि अस्वच्छ आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ थांबवून नवीन अद्ययावत जलकुंभ (Water Cooler) आणि शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
व्यावसायिक दृष्टिकोन: महामंडळाचा महसूल आणि रोजगार
नवीन इमारतीच्या रचनेबाबतचा प्रस्ताव. जर महामंडळाने नवीन इमारत बांधताना त्यामध्ये व्यावसायिक गाळे (Shopping Complex) काढले, तर त्याचे दोन मोठे फायदे होतील:
या गाळ्यांच्या भाड्यापोटी एसटी महामंडळाला दरमहा लाखो रुपयांचा महसूल मिळेल, ज्यामुळे तोट्यात चाललेले महामंडळ फायद्यात येईल. गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना माफक दरात व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळेल. यामुळे ओतूरच्या व्यापार क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते.ओतूर हे तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र असून येथील बस स्थानक हे विकासाचा चेहरा आहे. जर शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर आगामी काळात प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने निधी मंजूर करून ओतूरला ‘स्मार्ट बस स्थानक’ मिळावे, हीच जनभावना आहे.
Nanded News : रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालीचा संशय; ‘हाऊसफुल’ कोट्यांमागे हजेरीची साखळी?
जीर्ण इमारत पाडून अद्ययावत इमारत बांधणे.
उत्पन्नासाठी व्यावसायिक गाळे काढणे.
पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह आणि स्नानगृहाची उत्तम सोय.
दोन शिफ्टमध्ये कंट्रोलर आणि पार्सल/रिझर्वेशन खिडकी.
सिमेंट काँक्रीटीकरण आणि सुरक्षा यंत्रणा (CCTV).