पुण्यातील राजकीय हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक; शिष्टमंडळाची पोलिस आयुक्तांसोबत चर्चा
पुणे : शहरात गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रवृत्तींना त्वरित आळा घालण्याची मागणी पुणे शहर काँग्रेसने केली आहे. शहरात अलिकडच्या काळात झालेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांमुळे पुण्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा दावा करत पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. या घटनांमुळे मोठी किंवा प्राणघातक घटना घडू शकते, असा इशारा काँग्रेस शिष्टमंडळाने दिला.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या शहरातील वाढत्या राजकीय तणाव आणि हल्ल्यांबाबत निवेदन सादर केले. शहरातील अलिकडच्या घटनांबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. महाशिवरात्रीला भाजपला काँग्रेस भवनापासून फक्त ५० फूट अंतरावर निदर्शने करण्याची परवानगी देण्यात आली. निषेधादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनावर दगडफेक केली, ज्यामध्ये अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पत्रकार जखमी झाले. याशिवाय, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका वृत्तपत्र कार्यालयाबाहेर काही गुंडांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
हेदेखील वाचा : वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या दोन प्रमुख घटनांकडे पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले. निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, जर गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रवृत्तींना वेळीच आळा घातला नाही तर त्यामुळे मोठी किंवा प्राणघातक घटना घडू शकते. शहरातील शांतता बिघडू नये आणि पुण्याची प्रतिष्ठा राखली जावी यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन काँग्रेस नेत्यांनी पोलिस प्रमुखांना केले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी, राज्य कोषाध्यक्ष अधिवक्ता अभय छाजेड, संजय बालगुडे, अधिवक्ता रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम, प्रशांत जगताप, रफिक शेख, अजित दरेकर, अविनाश बागवे आणि इतर उपस्थित होते.
पुण्यात झाले होते आंदोलन
मागील आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कॉंग्रेस भवनावर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामध्ये अनेक कार्यकर्ते आणि महिला पोलीस जखमी झाले. टिपू सुलतान वक्तव्यावरुन हा वाद उफाळला. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ हे पुणे दौऱ्यावर आले होते.






