'आमचा डीएनए काँग्रेसचा, पक्ष कधीच सोडणार नाही'; कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार
कोल्हापूर : राधानगरी तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसची विचारधारा जपणारा तालुका आहे. याच विचारधारेने या तालुक्यातील जनता एकनिष्ठतेला नेहमी प्राधान्य देत आली आहे. आमचा डीएनए काँग्रेसचा असून, काँग्रेस कधीच सोडणार नाही, असा शब्द देत पक्षातच ठाम राहण्याचा निर्धार राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा ठाम विश्वास देत तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची भेट घेत काँग्रेससोबत राहण्याची ग्वाही दिली. काँग्रेसची विचारधारा एकसंघपणे राधानगरी तालुक्यात पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला.
हेदेखील वाचा : CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
यावेळी सतेज पाटील यांनी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणे ही माझी जबाबदारी आहे. असे निष्ठावंत कार्यकर्तेच पक्षाची खरी मुलुख मैदानी तोफ आहेत. त्यामुळे पुढच्या काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेसचा विचार अधिक बुलंद करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, या शब्दांत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी राधानगरी तालुका काँगेसचे तालुकाध्यक्ष भोगावतीचे ज्येष्ठ संचालक हिंदुराव चौगले यांनी राधानगरी तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आगामी सर्व निवडणुकांमध्ये खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जोमाने काम करतील, असे सांगितले.
दरम्यान, गोकुळ दुध संघाचे संचालक अभिजित तायशेटे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील, भोगावतीचे माजी संचालक ए. डी. पाटील, गुडाळ संजयसिंह पाटील तारळे, सुधाकर साळोखे, अशोक साळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, मोहन धुंदरे, लहू कुसाळे यांनी खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी प्रामाणिकपणे काम करुया असा निर्धार व्यक्त केला.
हेदेखील वाचा : ‘पाकिस्तान तर भारताची पत्नी झाली…’ ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत राडा, हनुमान बेनीवालचे विधान; म्हणाले ‘भारतात दहशतवाद…’
राहुल पाटील सोडणार काँग्रेसचा ‘हात’
दुसरीकडे, काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले असून, बुधवारी (दि. ३०) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.