
संगमनेरचे रघुवीर खेडेकर याना पद्मश्री जाहीर
तमाशा ही महाराष्ट्रातील बहुतांश भागांत सादर होणारी लोकप्रिय लोककला आहे. मात्र चित्रपटसृष्टीतून झालेल्या नकारात्मक मांडणीमुळे काही सन्माननीय अपवाद वगळता अनेक सुशिक्षित वर्गाने या कलेकडे पाठ फिरवली. अशा परिस्थितीत या क्षेत्रातून पद्मश्रीसारखा राष्ट्रीय सन्मान मिळवणे अत्यंत कठीण होते.
तमाशा कलाकारांनाही समाजात सन्मान व प्रतिष्ठा मिळावी, यासाठी ज्येष्ठ तमाशा अभ्यासक डॉ. संतोष खेडलेकर हे 2015 पासून सातत्याने प्रयत्न करत होते. यापूर्वी कांताबाई सातारकर यांच्यासाठी केलेले प्रयत्न दुर्दैवाने यशस्वी झाले नव्हते.
डॉ. खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रघुवीर खेडकर यांनी 2022 पासून पद्मश्रीसाठी प्रयत्न सुरू केले. तमाशा क्षेत्रातील 55 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेऊन हा पुरस्कार मिळावा, अशी त्यांची अपेक्षा होती. या प्रयत्नांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य शासनाकडून शिफारस केली होती.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदने दिली. तसेच केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यावर्षीच्या पुरस्कारासाठी अहिल्यानगरचे गणेश माळवे यांनीही महत्त्वाची मदत केल्याचे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
तमाशा रंगभूमीवर अत्यंत कष्टाने घालवलेल्या 55 वर्षांच्या प्रवासाकडे पाहताना, या आनंदाच्या क्षणी आई कांताबाई सातारकर यांची आठवण झाल्याने रघुवीर खेडकर भावुक झाले. त्यांनी आयुष्यभर तमाशा कलेसाठी स्वतःला झोकून दिले असून आईचा समृद्ध वारसा त्यांनी जपला आहे.
आज त्यांच्या तमाशा फडाच्या माध्यमातून सुमारे 300 कलाकार आणि कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हा सन्मान केवळ एका कलावंताचा नसून, संपूर्ण तमाशा परंपरेचा गौरव आहे. संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री सन्मान तमाशा कलेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देणारा ठरेल. ही लोककला लुप्त पावते की काय, अशी भीती असताना हा सन्मान तमाशा कलेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.