भाईंदर / विजय काते : मुंबई आणि परिसरातील वाहतूक सुधारण्यासाठी मेट्रो मार्गिका वाढवल्या जात आहेत. मात्र, या विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. आरे कॉलनीनंतर आता भाईंदरच्या डोंगरी गावातील हजारो झाडे मेट्रो कारशेडसाठी तोडली जाणार आहेत.याआधी १,४०६ झाडे हटवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता ९,९०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. एकूण वृक्षतोडीची संख्या १२,००० पर्यंत पोहोचली असून, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे.
मुंबईत मेट्रोच्या विविध मार्गिकांसाठी मोठ्या प्रमाणावर कारशेड तयार केल्या जात आहेत. मात्र, या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जात असल्याने पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याआधी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता भाईंदरच्या डोंगरी गावातील निसर्गसंपत्ती धोक्यात आली आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते, मुर्धा ते मोरवा गाव परिसरात मोकळी जागा उपलब्ध असतानाही डोंगरीतील डोंगराळ क्षेत्रच कारशेडसाठी निवडण्यात आले आहे. महसूल विभागाने ही सरकारी जमीन MMRDA ला हस्तांतरित केली असून, आता वृक्षतोडीसाठी महापालिकेकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पर्यावरणतज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांच्या मते, मेट्रो कारशेडच्या सर्वेक्षण प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला आहे. सामान्यतः असे सर्वेक्षण महापालिकेच्या संबंधित विभागाकडून केले जाते. मात्र, या प्रकरणात MMRDA ने खासगी कंपनीकडून सर्वेक्षण करून घेतले असून, त्यात दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे.पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे की, याआधी प्रशासनाने वृक्षतोडीनंतर केलेले पुनर्रोपण संपूर्ण अपयशी ठरले आहे. फक्त १०% झाडेही टिकलेली नाहीत. तरीही प्रशासन नवीन झाडे लावण्याच्या ग्वाही देत आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या वृक्षारोपणाचा परिणाम काय, याची ठोस माहिती दिली जात नाही.
पर्यावरण कार्यकर्ते धीरज परब आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. परब म्हणाले, “विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस सुरू आहे. झाडे तोडण्याचा निर्णय घेताना प्रशासन नागरिकांचे मत विचारात घेत नाही. ही पर्यावरणाची मोठी हानी आहे, जी भविष्यात गंभीर परिणाम करू शकते.”पालिकेने वृक्षतोडीवर हरकती व सूचना मागवल्या असल्या, तरी यापूर्वी अनेकदा नागरिकांच्या हरकती डावलण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रशासन झाडे तोडण्याचा निर्णय लादणार असल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही या प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, झाडे तोडल्याने तापमानवाढ, प्रदूषण, भूजल पातळी घटणे आणि जैवविविधतेचा नाश हे गंभीर परिणाम दिसून येतील. या भागात अनेक प्रकारचे वन्यजीव, पक्षी आणि जैवविविधता आढळते. वृक्षतोडीनंतर हे सर्व अधिवास नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणतज्ज्ञ यांचा प्रशासनाकडे स्पष्ट मागणी आहे की,
1. या प्रकल्पासाठी अन्य जागांचा विचार व्हावा.
2. झाडे तोडण्याऐवजी पर्यावरणपूरक उपाययोजना कराव्यात.
3. MMRDA ने पारदर्शक पद्धतीने अहवाल सादर करावा आणि नागरिकांचे मत विचारात घ्यावे.
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने प्रस्ताव मंजूर केल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. याला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक कितपत विरोध करतात, आणि प्रशासन त्यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पर्यावरणप्रेमींनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर वृक्षतोड रोखली गेली नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल. प्रशासनाने यावर त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.