कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील किरवली भागातील जंगलाची माहिती सर्वांना व्हावी आणि जंगल राखण्यासाठी ग्रामस्थांची मदत व्हावी यासाठी जंगल भ्रमंती सारखा आगळावेगळा उपक्रम वन विभागाने राबविला आहे. वन विभागाच्या कर्जत पश्चिम वनक्षेत्रात ही वन भ्रमंती ठेवण्यात आली होती आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनी जंगल भ्रमंतीचा आनंद घेतला.
कर्जत पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्रपाल समीर खेडकर यांनी आपल्या विभागातील शेतकरी,विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना आपल्या भागातील जंगलाची माहिती व्हावी यासाठी जंगल भ्रमंतीसारखा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यावेळी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करताना किरवली येथील वन जमीन सर्व्हे नंबर 53 मध्ये झालेल्या घनदाट जंगलात ग्रामस्थांना नेले. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून त्या सर्व्हे नंबर मध्ये 10 वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानिमित्ताने मोठी झाडी तेथे वाढली असून त्यात प्रामुख्याने औषधी झाडे यांची लागवड असल्याने लोकसहभागातून लागवड केलेल्या आणि डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य यांनी संवर्धन केलेल्या जंगलाची पाहणी या जंगल भ्रमंती मध्ये करण्यात आली. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून किरवली येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थ या जंगल भ्रमंती मध्ये सहभागी झाले होते.
किरवली सर्व्हे नंबर 53 या वन क्षेत्रामध्ये जंगल फिरती केली विविध प्रजातींच्या झाडाची माहिती देण्यात आली.या क्षेत्रात आढळणारे वन्यप्राणी तसेच मनुष्य आणि वन्यप्राणी यांचे संवर्धन कशा प्रकारे केले पाहिजे याबाबत माहिती देण्यात आली.त्याचवेळी अवैध वृक्षतोड,अवैध शिकार,अवैध उत्खन्न आणि वणवा प्रतिबंधात्मक उपाय बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.तसेच त्या ठिकाणी असलेले प्रत्येक झाड जगविण्याची सर्वांनी एकत्र मिळून सहकार्य केले पाहिजे असे आवाहन जागतिक वन दिनानिमित्त आयोजित जंगल भ्रमंती मध्ये वनक्षेत्रपाल समीर एस खेडेकर यांनी केले.यावेळी कर्जत (पश्चिम) वनपाल जितेंद्र चव्हाण तसेच वनरक्षक देवराज आदिवाड, वनकर्मचारी रविंद्र भोईर तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शरद पवार हे उपस्थित होते.या जंगल भ्रमंती मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या.सहभागी लहान मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी वन अधिकारी यांना झाडांची विविध प्रकारची माहिती समजून घेतली आणि ही भ्रमंती एंजॉय केली.