
शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळ सणासाठी आकर्षक अशा पद्धतीने पणत्या रंगवून आपल्या कलेला वाट मोकळी करुन दिली आहे.
सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात नेहमी विशेष विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून सदर उपक्रमाच्या माध्यमातून विशेष विद्यार्थ्यांचे हस्तनेत्र कौशल्यासह रंगसंगती, अंकमोजणी, सुक्ष्मकारक कौशल्य, रंगऒळख, एकाग्रता इत्यादी कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होते. आज विद्यालयात राबविलेल्या पणती रंगवणे उपक्रमात गणेश शिंदे, उत्कर्ष पारोदे, श्रावण खेडेकर, पियुष शिवले, प्रज्वल चांदगुडे, आयुष पसारी, ऋषीकेश दराडे या विशेष विद्यार्थ्यांनी आपला विशेष सहभाग नोंदवला होता तर सर्व विद्यार्थ्यांनी अनेक पणत्यांना वेगवेगळे रंग भरवत आपली कला दाखवून दिली आहे, सर्व विशेष विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पवन कट्यारमल, कलाशिक्षक संजय पोटफोडे, अक्षय लोहकपुरे, श्रीकृष्ण हरगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर सेवाधामचे संस्थापक सुभाष कट्यारमल व मार्गदर्शक प्रकाशजी धोका यांनी या उपक्रमाचे कौतुक करत या माध्यमातून विशेष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले.