
पाचगणीचा पर्यटनात 'कायापालट'; नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाचा कठोर 'वॉच'
वाई : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी शहराची शिस्त आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन सरसावले आहे. पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आणि शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रशासनाने कठोर नियमावली जाहीर केली असून, पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांपासून ते टॅक्सी चालकांपर्यंत सर्वांसाठी आता ‘ड्रेस कोड’ अनिवार्य करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या सभागृहात बुधवारी (दि.6) आयोजित करण्यात आलेल्या पॉईंटवरील सर्व व्यावसायिक, टॅक्सी चालक यांच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या बैठकीवेळी नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, आघाडी प्रमुख शेखर कासुर्डे, नगरसेवक राजेंद्र पारठे, आकाश बगाडे, अमित कांबळे, महेश खांडके, गणेश कासुर्डे, तसेच नामदेव चोपडे, सुधाकर बगाडे, सुनील पारठे यांच्यासह टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यसनमुक्ती आणि शिस्तीला प्राधान्य देताना…
शहरात आणि विशेषतः टेबल लँड परिसरात ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’ करणाऱ्यांविरुद्ध आता कडक मोहिमेचे स्वरूप धारण करण्यात आले आहे. मशीनच्या सहाय्याने तपासणी केली जाणार असून, अमली पदार्थांच्या नशेत किंवा मद्यप्राशन करून व्यवसाय करताना आढळल्यास संबंधिताला १०००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. “सेवा हाच धर्म” मानून पर्यटकांशी सौजन्याने वागण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
टेबल लँड आणि शहराचे सुरक्षा कवच म्हणून आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत शहर राहणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण पाचगणी शहर आता सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. एकूण ५२ सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवतील. विशेषतः टेबल लँड परिसरात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले असून, यामुळे गुंड प्रवृत्तीच्या आणि अघोरी स्पर्धा करणाऱ्या व्यावसायिकांना लगाम बसणार आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी ‘गुड टच – बॅड टच’ या नियमांचे पालन करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वाहतुकीचा खोळंबा आणि पर्यावरणाचे रक्षण
टेबल लँड रोडवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली असून, रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने घोडे बांधण्यावरही बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १५००० रुपयांचा दंड वसूल केला जाईल. तसेच, सायलेन्सरचा मोठा आवाज करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांचे सायलेन्सर जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. टॅक्सी चालकांनी आणि घोडेस्वारांनी शिस्त पाळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यटकांसाठी सोयीसुविधा आणि विकास
केवळ कारवाईच नव्हे, तर पर्यटकांच्या आणि प्राण्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. टेबल लँडवर घोड्यांना पाणी पिण्यासाठी ५,००० लिटरची टाकी आणि निवारण शेड उभारण्यात येणार आहे. शहराला कचरामुक्त करण्यासाठी कचरा कुंडीतच टाकण्याचे आवाहन शेखर कासुर्डे यांनी केले असून, संपूर्ण शहर ‘वाहतूक कोंडी ‘ मुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
टेबल लॅण्डवर युनियन कितीही असू द्या, प्रत्येकाला व्यवसाय मिळाला पाहिजे. त्यामुळे कुणीही नियमांचे उल्लंघन करू नये. घोडा आणि घोडा गाडीचे दरपत्रक लावण्यात येणार असून त्या दरानेच व्यवसाय करावा. कुणी जास्त पैसे घेतल्याची तक्रार आल्यास त्यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार आणि नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी दिला आहे.
पाचगणी हे आपले शहर
“पाचगणी हे आपले शहर आहे, येथे व्यावसायिकांनी एकमेकांशी अघोरी स्पर्धा न करता सहकार्याने व्यवसाय करावा. पर्यटकांना सुरक्षिततेची खात्री द्या आणि आपल्या व्यवसायास भरभरराटी द्या. अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल”, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.