
आषाढीपूर्वी विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन! (Photo Credit- X)
शतकानुशतके सुरू असलेल्या दर्शन परंपरेमुळे आणि भाविकांच्या अखंड स्पर्शामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर काही प्रमाणात झीज निर्माण झाली आहे. विशेषतः चरणभागातील झीज लक्षात घेता मूर्तीच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) तज्ज्ञांनी मूर्तीची तपासणी करून अहवाल सादर केला असून त्यानुसार संवर्धनाचे नियोजन करण्यात येत आहे.
मूर्तीच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का न लावता झिजलेल्या भागांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रकारच्या ‘स्टोन पावडर’चा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रामुळे दगडी मूर्तीची मजबुती वाढण्यासोबतच तिचे नैसर्गिक स्वरूपही कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, विठ्ठल मूर्ती संवर्धन हा केवळ तांत्रिक नव्हे तर श्रद्धा आणि परंपरेशी निगडित विषय आहे. त्यामुळे कोणताही निर्णय एकतर्फी न घेता वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी, संवर्धन तज्ज्ञ आणि मंदिर प्रशासन यांच्या सल्ल्यानेच अंतिम करण्यात येईल.
यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्ये मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनानंतर जवळपास पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने पुन्हा एकदा मूर्तीच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाणार आहे. विठुरायाच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलाकडे राज्यभरातील वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले असून, आषाढीपूर्वी संवर्धन पूर्ण होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आल्याने विठ्ठल मूर्ती संवर्धनाचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील नामवंत संवर्धन तज्ज्ञांना पंढरपुरात बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. तसेच विविध महाराज, वारकरी प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ज्ञ यांच्या सल्ल्यानंतरच अंतिम कार्यपद्धती निश्चित करून संवर्धनाच्या कामाला गती दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.