आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश
पंढरपूर प्रतिनिधी : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा स्थळे आणि रिंगण सोहळा परिसरातील सुविधांची पाहणी करत विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी प्रशासनाला विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. वारकरी व भाविकांना पाणी, आरोग्य, सुरक्षा, वीज आणि स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देताना स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, विजया पांगारकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजीत औटी, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान शितल तेली-उगले यांनी पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. पालखी तळांवर मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणीपुरवठा, वीज आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच हायमास्ट दिव्यांची संख्या वाढविण्याची सूचना त्यांनी केली. नातेपुते येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या वाढीव जागेचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देतानाच पालखी तळांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
भंडीशेगाव येथे संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी नव्याने उपलब्ध झालेल्या पालखी तळावरील जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारती हटवून ३० जूनपूर्वी सपाटीकरण व मुरूमीकरण करून परिसर स्वच्छ व सुयोग्य करावा, तसेच आवश्यक त्या ठिकाणी शौचालयांची उभारणी करावी, असे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. वारीदरम्यान वैद्यकीय सुविधांसोबत तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. ६५ एकर परिसरात दिंड्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणारी जागा अपुरी पडत असल्यास पर्यायी जागेचा शोध घेऊन व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण केली जात असल्याचे सांगितले. पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर सर्व भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्नानगृह, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष आणि महिला भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. दरम्यान, वारकरी आणि दिंड्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पालखी तळांसाठी वाढीव जागा उपलब्ध करून द्यावी तसेच जर्मन हँगरची संख्या वाढवावी, अशी मागणी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा विश्वस्त योगी निरंजन दास आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी केली. यानंतर विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव आणि वाखरी येथील पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज असून, वाढत्या वारकरी संख्येला लक्षात घेऊन सुविधा आणि स्वच्छतेच्या नियोजनाला यंदा विशेष गती देण्यात येत असल्याचे या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.






