पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत डूडूळगाव व किवळे येथे एकूण १,९४५ सदनिकांची संगणकीय सोडत पारदर्शक पद्धतीने घेतली.
आमदार शंकर जगताप यांनी सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची महापालिकेची भूमिका अधोरेखित केली.
यावेळी घर न मिळालेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्रेसर असून, केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यातून गरजू व बेघर नागरिकांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका सातत्याने कार्यरत आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारण्यात आलेल्या १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या ७५५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवारी पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पार पडली. या सोडतीचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात सदनिका वाटपाची पत्रे देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे शहर देशात सातव्या क्रमांकाचे व राज्यात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न महापालिका प्रत्यक्षात उतरवत आहे. सदनिकांची संगणकीय सोडत पूर्णतः पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली असून, या वेळी घर न मिळालेल्या नागरिकांनी निराश न होता प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत अर्ज करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रास्ताविक केले, तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार उपायुक्त बोदडे यांनी मानले.
दरम्यान, डूडूळगाव येथील १,१९० व किवळे येथील ७५५ सदनिकांच्या संगणकीय सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
Web Title: Pcmc conducts computerised lottery for 1945 houses under pradhan mantri awas yojana mla shankar jagtap